Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : दुसऱ्याच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणे कसे स्वीकारले जाईल ? शरद पवार यांनी दिली हि प्रतिक्रिया

Spread the love

पुणे : सध्या तुरुंगात असलेल्या राणा दांपत्याच्या  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या हट्टावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले कि , दुसऱ्याच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणे स्वीकारले जाऊ शकत नाही. तुमचे धार्मिक कार्य तुमच्या घरीच करा. तुम्ही माझ्या घरी येऊन हे काम केले आणि  माझ्या समर्थकांशी संघर्ष झाला तर त्यांना दोष देता येणार नाही. शरद पवार म्हणाले की, यामुळेच अलीकडच्या काळात वैयक्तिक हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.

एखाद्या धर्मासंबंधी किंवा विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना आणि विचार आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवायच्या असतात, पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो तर त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटते असे  शरद पवार यांनी  म्हटले आहे.

विरोध फक्त सभेपुरता असायचा

पवार म्हणाले कि , मी इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातही जाहीर मतभेद होते. आम्ही एकमेकांविरुद्ध शब्द वापरताना कधीही काटकसर केली नाही. परंतु  आम्ही कधीच एकमेकांसाठी खालच्या दर्जाचे शब्द वापरले नाहीत. सभा  संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेकदा औरंगाबादला सभा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. मात्र सभा संपल्यानंतर आमची संध्याकाळ ज्येष्ठ नेते बापू काळदाते आणि अनंत  भालेराव यांच्यासोबत जायची. तेव्हा आपण सभेत काय बोललो, याचे स्मरणही होत नसे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी शांतता आणि सलोख्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भाजपवरही टीका

दरम्यान शरद पवार यांनी विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षावरही  हल्लाबोल केला आहे. सत्ता येते आणि जाते, पण यासाठी अस्वस्थ होण्याची गरज नाही. भाजपचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोक अस्वस्थ झाले आहेत, त्यांना मी दोष देणार नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत होते पण तसे झाले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केवळ धमकी असल्याचेही ते म्हणाले. त्यातून काही निष्पन्न होत नाही. निवडणुकीची परिस्थिती कायम राहिली तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालाने काय निकाल लागणार हे दाखवून दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!