Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : कोल्हापूर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबतीत दिला ‘हा’ निर्णय…

Spread the love

कोल्हापूर : सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांचा ताबा त्यांनी कोल्हापूर पोलिसांना दिला होता. आज सदावर्ते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीने वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली. सदावर्ते यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने युक्तीवादानंतर सदावर्ते यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान आज वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. वकील सदावर्ते यांनी अनेक भाषणे केली आहेत. या भाषणांद्वारे जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांची अनेक भाषणे यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. शिवाय खुद्द गुणरत्न सदावर्ते यांनी आपण काही मुलाखती दिल्याचेही न्यायालयात कबूल केलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित तपासणी करणे गरचेचे असून त्यासाठी त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी शाहूपुरी पोलिसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. मात्र, दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी सदावर्ते यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात मराठा समाज समन्वय समितीने वकील सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवरून कलम १५३ अ अन्वये वकील सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सदावर्ते यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन एकोप्याला बाधा येण्याची शक्यता असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली. मराठा समाज समन्वय समितीचे दिलीप मधुकर पाटील यांनी ही तक्रार दिली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!