Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeNewsUpdate : चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत वाॅचमनचा मृत्यू , चार अटक, तीन ताब्यात

Spread the love

औरंगाबाद : सार्वजनिक सभागृहातील लाईट चोरल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत वाॅचमनचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सिडको पोलिसांनी आज पहाटे ६वा. १८ मि. गुन्हा दाखल करंत चार आरोपी अटक केले आहेत तर तिघांना ताब्यात घेतलेअसल्याची माहिती पोलीस निरीक्षक  श्रध्दा वायदंडे यांनी दिली आहे. अटक आरोपींमधे सतीश भास्कर खरे (४५) रा.सिध्दार्थनगर,सागर गणपत खरात,(२८) रोहन गणपत खरात (२६) शिवम नरेंद्र तुये(२६) यांचा समावेश आहे तर आनंद गायकवाड, आनंद सोळस व अष्टपाल गवई या तिघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी २७ वर्षीय वॉचमनला घरातून बोलावून आणले आणि हात , पाय बांधून लाकडी दांड्यानी त्याला बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवून आपल्या भावाला पाठवला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाॅचमनचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२१) औरंगाबादेतील हडको भागातील विवेकानंदनगरमधील भागातील मेघावाले सभागृहात घडली.

लाईट चोरी केल्याचा होता संशय

मनोज शेषराव आव्हाड (२७, रा.विवेकानंद नगर) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. .पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोज गेल्या एक वर्षापासून विवेकानंदनगर भागातील मेघावाले सभागृहात देखरेखीचे काम करीत होता आणि  सभागृह परिसरात असलेल्या एका खोलीत तो पत्नी व दोन मुलांसह राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेलेली होती. त्या सभागृहाचे संपूर्ण काम सागर खरात पाहत होता. काही दिवसांपूर्वी सभागृहातील फोकस लाईट चोरीला गेले होते. ते लाईट वॉचमन मनोजने चोरी केल्याचा संशय सागर खरातला होता. त्यामुळे त्यांनी मनोजला कामावरून काढून टाकले होते. यानंतर राहण्याची सोय नसल्याने मनोज चंपा चौक येथेआईकडे राहायला गेला होता.

मयत वाॅचमनला घाटीत सोडून आरोपी पसार …

दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सागर खरात, सतीश खरे आणि इतर पाच ते सहा जणांनी चंपा चौक येथे घरी जाऊन मनोजला सोबत घेऊन विवेकानंदनगर येथील सभागृहात आणले. तेथे आल्यावर आरोपीनी भर उन्हात उभे करून मनोजचे हात आणि पाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी दरम्यान वेदना असह्य झाल्याने मनोजला भूरळ आली आणि तो खाली पडला. मात्र, यानंतरही आरोपींनी  मनोजच्या अंगावर थंड पाणी टाकून त्याला पुन्हा शुद्धीवर  आणले  पुन्हा त्याला मारहाण सुरुच ठेवली. बराच वेळ मारहाण सहन केल्यावर हात-पाय बांधलेल्या अवस्थेतच मनोज निपचित जमिनीवर पडला. त्यानंतर  मारहाण केल्यावरही मनोज हालचाल करीत नसल्याचे आरोपींच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच अवस्थेत एका लोडिंग रिक्षामध्ये मनोजला टाकले व अष्टपाल गवई याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात मनोजला सोडून पोबारा केला. दरम्यान, घाटीतील डॉक्टरांनी तपासून मनोज ला मृत घोषित केले. सोबतच ही माहिती पोलिसांना कळवली. या प्रकरणी पुढील तपास एपीआय श्रध्दा वायदंडे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!