Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मराठी अभिनेता संदीप पाठकने रोवला अटकेपार झेंडा … महाराष्ट्राची उंचावली मान !!

Spread the love

मुंबई : प्रसिद्ध सिने अभिनेता संदीप पाठक याने नुकताच आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपले  नाव कोरून मराठी सिनेसृष्टीचा झेंडा अटकेपार रोवला आहे. एकूणच मराठी सिनेसृष्टीसाठी हि अभिमानाची बाब आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून संदीपने मनोरंजनाचे क्षेत्र यस्वीरित्या पादांक्रीत  करीत संदीपने  कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. ‘राख’ या मराठी चित्रपटात संदीपने  साकारलेल्या भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. संदीपला  आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्राची आणि खासकरून संदीपची जन्म भूमी असलेल्या मराठवाड्याची मान निश्चितच उंचावली आहे.


या गटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि’लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपने  हा पुरस्कार पटकावला. राजेश चव्हाण यांनी या सायलेंट मुव्हीचं दिग्दर्शन केले आहे. कोणत्याही संवादाविना संदीपने साकारलेल्या या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.


या पुरस्काराची बातमी आल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला कि ,

“हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. ‘राख’ च्या संपूर्ण टिमने  घेतलेल्या मेहनतीचे  हे फळ आहे. ‘’राख’’मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असल्यानं यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे.” या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच…”  असल्याचंही संदीप म्हणाला.

कोण आहे संदीप पाठक

गेल्या ३० -३५ वर्षांपासून मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एक प्रयोगशील अभिनेता म्हणून संदीप पाठकची ओळख आहे. संदीप मूळचा माजलगाव , जि . बीड येथील असून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतरत्याने आपल्या कला आणि अभिनयाच्या आवडीमुळे पुण्यातील ललित कला केंद्राकडे कूच केले. संदीपला बालपणीच आई -वडिलांकडून कलेचा वारसा मिळाला आसल्याने बालवयापासूनच संदीपला अभिनयाची आवड आहे. ललित कला केंद्रातून त्याने  पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेऊन संदीपने २००० साली मुंबई गाठली.

मुंबईत आल्यानंतर अनेक नाटक, मालिका, चित्रपटांत त्याने  विविध भूमिका केल्या. २०१० मध्ये आलेल्या ‘श्वास’मधील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एक डाव धोबीपछाड’, शहाणपण देगा देवा’, ‘रंगा पतंगा’, ‘पोस्टर गर्ल’ , ‘एक हजाराची नोट’ असे ५० हुन अधिक चित्रपट , ‘फू बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, अशा मालिकांतून, ‘असा मी असामी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘जादू तेरी नजर’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘सासू माझी धांसू’ या नाटकांतून तो प्रेक्षकांसमोर आला. प्रसिद्ध नाट्य अभिनेते प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्यानंतर त्याने  ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे असंख्य प्रयोग करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.

दरम्यान २० वर्षांच्या आपल्या अथक परिश्रमानंतर  ‘इडक’च्या निमित्ताने संदीप “कान चित्रपट महोत्सवा”तही  चांगलाच गाजला.  राज्य   सरकारचा पुरस्कारही  ‘इडक’ ला  मिळालेला आहे. संदीपला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्राची आणि खासकरून जन्म भूमी असलेल्या मराठवाड्याची मान निश्चितच उंचावली आहे. या यशाबद्दल संदीपला खूप खूप शुभेच्छा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!