Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkrainIndiaNewsUpdate : भारताने सांगितले आणि रशियाने सहा तास युद्ध थांबवले ? काय आहे तथ्य ?

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून काही लोक भारतात अफवा पसरविण्यात चांगलेच माहीर आहेत . याचे परिणाम काय होतात हे भारतीय चांगलेच अनुभवत आहेत . परंतु रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या निमित्तानेही बढाया मारणाऱ्या सोशलमिडीया गँगने अशा काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला कि , थेट परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बाहेर येऊन सांगावे लागले कि , वस्तुस्थिती तशी नाही !! मग काय आहे वस्तुस्थिती जाणून घेऊयात …


विषय असा आहे कि , युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या ८ दिवसांपासून सशस्त्र संघर्ष चालू आहे . या संघर्षादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भारतीय विद्यार्थी अजूनही जीवन मरणाचा संघर्ष करीत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना खार्किव सोडण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र या व्हायरल अफवेची गांभीर्याने दखल घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तांचे केवळ खंडनच केले नाही तर  आमच्या विनंतीवरून रशिया – युक्रेन दरम्यानचे युद्ध थांबलेले नाही असे म्हटले आहे.

वस्तुस्थिती काय आहे ? अरविंदम बागची सांगताहेत …

याचा खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे कि ,  “आमच्या सांगण्यावरून युद्ध थांबेल असे नाही. हे असे म्हणणे म्हणजे भारताच्या सांगण्यावरून पुन्हा बॉम्बफेक सुरू होईल की काय, असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे मी या अहवालांवर भाष्य करू शकत नाही,”. “खार्किव आणि सुमी येथून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आमचा अंदाज आहे की आमच्या सल्ल्यानंतरही काहीशे भारतीय अजूनही खार्किवमध्ये आहेत,” असे बागची पुढे म्हणाले.

अद्याप काम संपलेले नाही

बुधवारच्या सल्ल्यानुसार, मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी खार्किव सोडले, ते जवळच्या पेसोचिनमध्ये आहेत आणि त्यांची संख्या अंदाजे १,००० आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. खार्किव सोडल्यानंतर पेसोचिनमध्ये आलेल्या भारतीयांना युक्रेनच्या पश्चिम भागात हलविण्याचे काम करत आहे. “युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर सुमारे १८,००० भारतीय युद्धग्रस्त देश सोडून गेले आहेत. आमची पहिली अॅडव्हायझरी जारी झाल्यापासून एकूण १८,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनची सीमा सोडली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ३० उड्डाणांनी ६,४०० भारतीयांना युक्रेनमधून परत आणले आहे. पुढील २४ तासांत १८ उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत,” असेही  मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या योजनेला वेग येत आहे. गेल्या २४ तासांत १५ विमाने भारतात दाखल झाली असून, तीन हजारहून अधिक भारतीयांना परत आणले आहे. युक्रेनमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर एक निवेदन देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील २४ तासांसाठी १८ उड्डाणे नियोजित आहेत.

आम्ही युक्रेन आणि रशिया दोघांच्याही संपर्कात

“आम्हाला युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कळले आहे की काल अनेक विद्यार्थ्यांनी खार्किव सोडले. काही अजूनही अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशिया दोघांच्याही  संपर्कात आहोत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. “सुरुवातीला युक्रेनमध्ये २०,००० भारतीय नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती, पण अनेकांनी नोंदणी केली नव्हती. आमचा अंदाज आहे की काहीशे नागरिक अजूनही खार्किवमध्ये राहत आहेत. आमचे प्राधान्य विद्यार्थी आहेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

युक्रेन  शेजारच्या देशांचे मानले आभार

युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या विमानांपैकी तीन भारतीय वायुसेनेची आहेत. उर्वरित व्यावसायिक उड्डाणे आहेत, ज्यात एअर इंडिया, इंडिको, स्पाइस जेट, गो एअर आणि गो फर्स्ट यांचा समावेश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही आणखी उड्डाणांचे नियोजन करत आहोत आणि येत्या २-३ दिवसांत मोठ्या संख्येने भारतीय परत येतील. मी युक्रेन सरकार आणि शेजारील देशांचे यजमानपदासाठी आभार मानू इच्छितो. आमचे लोक. मला  त्यांचेही कौतुक करायचे आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!