Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास सांगितला गेला नाही : डॉ.धोंडोपंत मानवतकर

Spread the love

मंठा :  आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी म.जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाची मदत करून संरक्षण तर दिलेच शिवाय त्यांनी उमाजी नाईक यांच्यासोबत भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी सशस्त्र आंदोलन चालविले ; देशातील या क्रांतीपर्वात अशा महत्वाच्या दोन आघाड्या सांभाळणाऱ्या आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास भारतीयांना सांगितला गेला नाही, त्यांचे क्रांतिकारी आंदोलन पुढे त्यांच्या अनुयायांनी चालविले म्हणून लहुजी साळवे हे बहुजनाच्या सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक क्रांतीचे आद्यशिल्पकार ठरतात असे प्रतिपादन डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले.


मंठा येथील साठे नगरात दि. १७ फेब्रुवारी रोजी आद्यक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या १४१ व्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते. डॉ मानवतकर पुढे म्हणाले की, मुक्त्ता साळवेंच्या रुपाने त्यांनी आधुनिक भारतात पहिल्यांदा धर्म चिकित्सा करून सत्यशोधक संस्कृतीला जन्म दिला. समाजाला शोषणमुक्त करण्यासाठीच त्यांनी “सार्वजनिक सत्यधर्मा”ची स्थापन केली.ज्या धर्माची समाजाला आजही गरज आहे. महाराष्ट्रच्या सामाजिक, सांस्कृतिक परिघावर जे परिवर्तन घडून येत आहे. त्या परिवर्तनाचा आरंभ बिन्दू म्हणजे लहुजी साळवे होय.

मान्यवरांचा सत्कार

हिमालयासारखे धैर्य बाळगून परिवर्तनाची ललकारी देणारे लहुजी साळवे हे बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचे व भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे ते मुख्य प्रवर्तक होते त्यांच्यासारख्या सर्वच महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी कय्युमभाई कुरेशी (माजी पं.स.सदस्य मंठा) हे होते, तर नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रताप चाटसे, डॉ.प्रविण माळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री.मारोतराव खनपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साठे नगरात मातंग समाज मंदिरासाठी एक भव्य जागा दान केल्याबद्दल हाजी कय्युमभाई कुरेशी यांचा विशेष सत्कार करून समाज बांधवांनी त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ.प्रताप चाटसे, अरुण वाघमारे, डॉ.प्रवीण माळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक मारोतराव खनपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाचे अभ्यासक, प्रचारक श्री संदीप इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राजेश एम. खनपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज खनपटे, प्रदीप कांबळे, विजय खनपटे, सतीश खनपटे,चंद्रकांत खनपटे,अहिलाजी खनपटे, अजय गायकवाड, नंदकिशोर, विलास खनपटे, योगेश गायकवाड, लखन कांबळे, पंकज अडागळे, नाना खनपटे, यांनी अथक परिश्रम घेतले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!