Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचे वारसदार बसल्याशिवाय महाराजांचे कार्य पूर्ण होणार नाही : प्रदीप सोळुंके

Spread the love

औरंगाबाद : कोणीही महाराष्ट्राशी खेटताना छत्रपती शिवरायांचा इतिहास तपासावा असे उदगार शिव व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजगार उत्सवात बोलताना काढले. दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचे वारसदार बसल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्ण होणार नाही , त्यासाठी महाराष्ट्रातील मावळ्यांनी  कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे असेही सोळुंके आपल्या व्याख्यानात म्हणाले.


औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शिवजयंती निमित्ताने शिवसेना आयोजित ‘शिवजागर 2022’ च्या निमित्ताने पुतळा अनावरण पूर्वसंध्येला  ‘ छत्रपतींच्या विचाराची तळपती तलवार ‘ या विषयावर प्रदीपदादा सोळुंके बोलत होते. या प्रसंगी आ प्रदीप जैस्वाल, आ संजय सिरसाट, शिवजागर चे संयोजक आ अंबादास दानवे, आ उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे,  गिरजाराम हाळनोर अण्णा , नगरसेवक अंकिता विधाते  आदी  मान्यवर उपस्थित होते.

शिवराय  रयतेच्या राज्यासाठी लढत होते…

प्रारंभी  ‘शिवजागर 2022’ चे संयोजक आ अंबादास दानवे यांनी दि 15 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान आयोजित भरगच्च कार्यक्रमाची माहिती दिली. आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना प्रदीप सोळुंके म्हणाले की, ” औरंगजेब आणि सगळी मोगलाई  स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी साठी लढत होते तर शिवराय  रयतेच्या राज्यासाठी लढत होते म्हणून जगभर शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.
छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राजे होते म्हणून जगातील राज्यकर्ते, जनता शिवरायांना आदर्श राजा मानतात. शिवरायांनी जनहीताचे घेतलेले निर्णय पाहता शिवाजी महाराजांचे राज्य हे वरून राजेशाही आणि आतून लोकशाही असलेले जनतेचे राज्य होते. मध्यरात्री अनेक किल्ले जिंकणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री होणार असेल तर योग्यच आहे असे मतही प्रदीप सोळुंके यांनी व्यक्त केले.

शत्रू पक्षाच्या स्त्रियांचाही आदर

आपल्या व्याख्यानात शिवरायांच्या लोककल्याणकारी विचाराची माहिती देताना सोळुंके म्हणाले कि , महाराष्ट्राच्या या राजाने आपल्या मावळ्यांच्या आणि कुशल नियोजनाच्या जोरावर कधीही आपले राज्य आपल्या हातातून जाऊ दिले नाही. शिवयांच्या राज्यात स्त्रियांचा आदर होता. बलात्कार करणारांना ते आपल्या सैन्यातील सरदार असले तरी त्यांना शिक्षा करताना त्यांनी जि केली नाही. शत्रू पक्षांच्या स्त्रिया सुद्धा महाराजांच्या राज्यात सुरक्षित होत्या. आजच्या राज्यकर्त्यांनी हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मोगलांकडे अफाट सैन्य आणि पैसा असला तरी महाराजांकडे त्यांच्या जीवाला जीव देणारे निष्ठावंत मावळे होते. जे सावराज्यासाठी लढतील ते सर्व मराठे अशी त्यांची व्याख्या होती. त्यांच्या सैन्यात अठरा पगड जातींच्या मावळयाचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कार्य केले तर महाराष्ट्राला दिल्ली जिंकणे अवघड नाही असेही ते म्हणाले.

क्रांती चौकात झालेल्या या व्याख्यानाला  मोठ्या संख्येने महिला, तरुण, शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रारंभी शिवसेनेचे दिवंगत नेते सुधीर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेचा शिवजगार महोत्सव चालू असून यामध्ये पहिल्या दिवशी शाहीर गणेश गलांडे आणि सहकाऱ्यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला. याशिवाय शहरातील विविध ढोलपथक आपले कार्यक्रम सादर करीत आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर शिव आरती आणि फटाक्यांची आकर्षक आतषबाजी औरंगाबादकरांचे आकर्षण झाले आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे.

आज मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण

दरम्यान क्रांती चौकातील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे.  देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण औरंगाबाद महानगरपालिकेने पूर्ण केले. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादकर या दिवसाची वाट बघत होते… अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थित तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्यक्ष उपस्थित या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!