Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कालिचरण महाराजचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love

रायपूर: ‘कालीचरणवर जो आरोप आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे’, अशी टिपण्णी करत रायपूर कोर्टाने कालिचरण महाराजचा जमीन अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज उर्फ अभिजीत सराग याला छत्तीसगडमधील रायपूर येथील कोर्टाने हा दणका दिला आहे. दरम्यान, कालीचरणला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


छत्तीसगडच्या रायपूर येथे आयोजित धर्मसंसदेत कालीचरण महाराजच्या भाषणाने खळबळ उडाली होती. आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करताना कालीचरणने गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला प्रणाम केला होता. त्यानंतर देशभरात त्याच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका होऊन खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी याची तातडीने गंभीर दखल घेत कालीचरणविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यासोबतच धर्मसंसदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. कालीचरण महाराजला ३० डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. तिथे जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

कालीचरणला प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याचा जामीन नाकारत १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी त्याच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता कोर्टाने अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर आता कालीचरणच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात जाण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, कालीचरण याच्यावरील कारवाईने राजकारणही तापले असून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह या भाजप नेत्याने छत्तीसगड सरकारवर टीका केली आहे. इंदूरमध्ये कालीचरण महाराजच्या समर्थनार्थ अखिल भारतीय हिंदू महासभा व अन्य संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या संघटनांच्या ५० कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!