Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : महाराष्ट्रात एकाच दिवशी आढळले ओमायक्रॉनचे ८ रुग्ण

Spread the love

मुंबई : राज्यात आज दिवसभरात आणखी ८ रूग्ण ‘ओमायक्रॉन’ बाधित आढळल्याने आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर  गेल्या २४ तासात ८५४ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात आज ११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
एकूण ४८ ओमायक्रॉन बाधितांमध्ये मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३ , सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ अशी रूग्ण संख्या आहे. तर, यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कुठे आढळले हे ८ रुग्ण ?

मुंबईतील चारही रूग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रूग्ण मुंबईतील आहे. इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत. याशिवाय सातारा येथील ३ रुग्ण हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे. तर पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.

कोरोनाची स्थिती अशी आहे

राज्यात गेल्या २४ तासात ८५४ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९६,७३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात आज ११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७५,७०,९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४८,६९४ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८०,०३९ व्यक्ती गृह विलगीकरणात  तर ८८६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी

दरम्यान राज्यातील कोरोनाची एकूण परिस्थिती लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने आगामी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस डे आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याखाली असे नमूद केले आहे की-

बंद हॉलमधील कोणत्याही कार्यक्रमासाठी हॉल क्षमतेच्या केवळ ५० टक्के लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल. त्याच वेळी, क्षेत्राच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के खुल्या ठिकाणी सहभागी होण्याची परवानगी असेल.

कोणत्याही कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक लोक एकत्र जमायचे असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, मॉल्स आणि इतर सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांना हजेरीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

सर्व नागरिकांना कोरोनाच्या  लसीच्या दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीसह सार्वजनिक ठिकाणी ज्या लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच परवानगी दिली जाईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणी/संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच कोणत्याही कार्यात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर, नियमित स्वच्छता आणि सर्व परिसर/खोल्या/शौचालयांची स्वच्छता अनिवार्य आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!