Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawarBirthdaySpecial प्रासंगिक : शरद पवार : लोकशाहीचा सर्वसमावेशक जाणता नेता

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस . महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि जाणते राजकारणी म्हणून पवार ओळखले जातात. केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या नावाचा दबदबा आहे. वयाच्या ८० वर्षांनंतरही शरद पवार यांच्या नावाचा करिष्मा कायम आहे. या वयातही पवार तरुणांना लाजवेल इतक्या तडफेने महाराष्ट्र पिंजून काढतात. राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करतात त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश झोत टाकणारा हा प्रवीण गायकवाड यांचा विशेष लेख या निमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत. : संपादक


भारत नावाचा हा भूभाग हजारो वर्षे चर्चेत राहिला आहे. हजारो वर्षांच्या कालखंडातील इतिहास वेगवेगळा राहिलेला आहे. तो इतिहास समजून घेणं यासाठी महत्वाचं आहे कारण हा भिन्न समूहांचा प्रदेश राहिलेला आहे. पुढे राजे-राजवटी तर होत्याच. काहींचा पराक्रमी इतिहास होता तर काहींनी तडजोडी करत आपली राज्य चालवली. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सन १६७१ रोजी ४० किल्ले होते व १६७८ मध्ये त्यांच्याकडे एकूण ३६९ किल्ले होते. याचा अर्थ काय होतो? तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याचा विस्तार बारा बलुतेदारांना एकत्रित आणून ‘सर्वसमावेशक’पणे केला. हा सर्वसमावेशकपणा इतिहासात पुढेही दिसतो.

‘सर्वसमावेशक’ सरकार , गांधींचे स्वप्न ‘

सन १९४७ रोजी खऱ्या अर्थाने ‘भारत’ देश म्हणून नावारुपास आला. ब्रिटिशांकडून जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा साधारण ५६५ संस्थाने येथे होती. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे बंगाल येथील हिंदू – मुस्लिम दंगल मिटवण्यात व्यस्त होते. पुढे हाच वारसा सरदार वल्लभभाई पटेलांनी चालवला आणि हळूहळू ५६५ संस्थानं भारतात समाविष्ट करुन घेतली. अखंड भारताचे स्वप्न साकार झाले आणि आज त्याला ७५ वर्षे होत आहेत. कॉंग्रेसला त्यावेळी केंद्रीय मंत्रीमंडळात सर्व कॉंग्रेसचे नेते हवे होते. परंतु महात्मा गांधींना ते मान्य नव्हते. कारण हा देश सर्व छोट्या-मोठ्या जाती-धर्मांनी बनलेला होता. येथे शेकडो भाषा बोलल्या जात होत्या. आजही देशात तीच परिस्थिती आहे. जर भारताने लोकशाही स्वीकारली आहे तर मग सर्व घटकांचा समावेश यात पाहिजे असे मत गांधींनी व्यक्त केले आणि त्यातूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शामाप्रसाद मुखर्जी, बलदेव सिंग, मौलाना अबुल कलाम आझाद, जौन मथाई, अम्रित कौर, इत्यादी नेत्यांचा व पक्ष संघटनेचा समावेश होता. थोडक्यात काय, तर हा देश चालवायचा असेल तर येथे ‘सर्वसमावेशक’ सरकार असणे गरजेचे आहे हे गांधीजींनी त्याचकाळी ओळखले होते. कृती करुन तशी दिशाही दिली.

शरद पवार यांचे ५४ वर्षाचे राजकारण

हाच ‘सर्वसमावेशक’ विचार आणि कृती आपल्याला पद्मविभूषण शरद पवार  यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आणि त्याचबरोबर शरद पवार  गेली सहा दशकं सक्रिय राजकारणात आपल्याला दिसतात. सन १९५६ साली गोवा मुक्ती संग्रामावेळी शालेय दशेत असणाऱ्या पवारांनी प्रवरानगर येथे मोर्चा काढला होता. नंतर सन १९५८ रोजी युथ कॉंग्रेसचे सभासद झाले व सन १९६२ ला युथ कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष झाले. त्यावेळी भारत-चीन युद्ध चालू असताना त्यांनी पुण्यात चीन विरोधी भव्य मोर्चा देखील काढला होता. पक्षाच्या प्रभावशाली नेत्यांच्या ते नियमित संपर्कात तर होतेच शिवाय त्यांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्व गुणांमुळे सन १९६४ ला महाराष्ट्र युथ कॉंग्रेसचे ते सचिव झाले. पुढे वयाच्या २७ व्या वर्षी सन १९६७ साली पवार बारामती येथून आमदार म्हणून निवडून आले. विद्यार्थी दशेपासून राजकारणात रस घेणारे पवार  गेली ५४ वर्ष संसदीय राजकारणात यशस्वी आहेत. तसेच लोकशाहीतील विधान सभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा अशा चारही सभागृहात काम केलं.

स्वतंत्र भारतातले सर्वांत तरुण मुख्यमंत्री

महाराष्ट्रासह भारताची विविधतेची जाण व समज शरद पवार यांना होती व आज ही आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. आणि वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार हे स्वतंत्र भारतातले सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. त्यांचा ‘सर्वसमावेशकते’चा विचार येथे अधोरेखित करता येतो. राज्यात आणि देशात ‘युती’चे अर्थात Coalition सरकार बनू शकतं हे पवारांनी दाखवून दिले. किंबहुना पवारांनी ‘युती’ अथवा ‘आघाडी’ सरकारचा नवा फॉर्म्युलाच देशाला दिला. यातून काय दिसतं? तर देशात आणि कुठल्याही राज्यात लोकशाही टिकवायची असेल तर बहुक्षीय पद्धतीनेच पुढं गेलं पाहिजे.

आपल्या देशात समाजवाद, साम्यवाद, पुरोगामी, हिंदूत्व, आंबेडकरवाद, गांधीवाद, इत्यादी मतप्रवाह किंवा विचारधारा आहेत. या साऱ्याचे सखोल आकलन पवार यांना  आहे म्हणून सतत नव-नवीन प्रयोग ते करत असतात जेणेकरुन येथे सर्व जाती-धर्मांचे प्रतिनिधित्व असलं पाहिजे. कधीही पवार हे टोकाची भूमिका घेताना आपल्याला दिसले नाहीत. सर्वसमावेशकता काळाची गरज आहे. सर्व घटकांचा आवाज लक्षात घेऊन-ऐकून देश चालला पाहिजे याची स्पष्टता मुळातच त्यांना  इतरांपेक्षा अधिक आहे. बहुपक्षीय राजकारण ही पवारांची कला किंवा हाततोटी आहे हे वेळोवेळी सिद्ध झालाय. आपला देश द्विपक्षीय नाही तर बहुपक्षीय पद्धतीने चालतो.

विरोधी पक्ष नेते शरद पवार

हे असंच बहुपक्षीय मॉडेल बीजेपी सरकारने National Democratic Alliance (NDA) स्थापन करुन अटल बिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९७ रोजी राबवले. तेव्हा पवार यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका चोखपणे बजावली. पुढे १९९९ साली पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले परंतु त्यांनी ‘कॉंग्रेस’ विचारधारा कधीच सोडली  नाही. त्यांनी  केंद्रात संरक्षण मंत्रीपद, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपद व कृषी मंत्रीपद भूषवलं आहे. परंतु २००४ मध्ये पवार साहेबांनी देशातील विविध पक्षांना एकत्र आणत महत्वाची भूमिका बजावली आणि United Progressive Alliance (UPA)च्या मुख्य शिल्पकारपैकी एक ठरले कारण त्यांना बहुपक्षीय राजकारणाशिवाय पर्याय नाही हे चांगलेच ठाऊक होते. राज्यस्तरीय पक्षांचा आवाज देशात टिकला पाहिजे याचे ते पुरस्कर्ते आहेत.

महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग

आता देखील केंद्रात बीजेपीचे सरकार दोन-तृतींश असून नरेंद्र मोदी हे एकाधिकारशाहीने सरकार चालवत आहेत हे कित्येक निर्णय बघितल्यावर समजते. नोटबंदी, काश्मीरचा मुद्दा, शेतकऱ्यांचे मुद्दे या साऱ्यात नागरिकांना गृहित धरले होते हे दिसलेच. जगातील बऱ्याच देशात संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे त्यांची वाटचाल झाली हे विसरता कामा नये. मोदी-शाह यांना टक्कर देण्याची धमक त्यांच्यामध्ये  दिसते. आपल्या देशात एकाधिकारशाही येऊ नये म्हणून पवार साहेबांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करुन नवा प्रयोग यशस्वी केला. शिवसेनासारखा एका वेगळ्या विचारधारेचा पक्ष शरद पवार यांनी सोबत घेऊन शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार स्थापन करुन पुन्हा एका सर्वसमावेशकता दाखवून दिली. अशक्य वाटणारी गोष्टी प्रत्यक्षात उतरवून अनोखी किमया फक्त पवारच करु शकतात.

थोडक्यात काय तर लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसमावेशकपणे वाटचाल केली पाहिजे. शरद पवार यांचा  व्यापक दृष्टिकोण नेहमी दिसतो. ते धूर्त राजकारणी आहेत हे आपण जाणतो. त्यांचे फॉर्म्युले यशस्वी होताना आपण पाहिले आहेत. मर्यादा ओळखून कृतीशील पर्याय देणारा हा नेता आहे. संकटांना सामोरे कसे जायचे, मोजके बोलायचे, सर्व घटकांचे ऐकायचे, विकासाचे राजकारण करायचे हे सारं त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शिक्षण, कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक, शेती क्षेत्रात पवारांनी फार मोठे काम करुन ठेवले आहे आणि म्हणूनच, या लोकशाहीच्या सर्वसमावेशक जाणत्या नेत्याला सलाम करावासा वाटतो.

– प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

आपलं सरकार

Click to listen highlighted text!