Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अखेर मुंबईत एमआयएमची भव्य रॅली , दोन खासदारांनी गाजवली सभा , महाविकास आघाडीवर टीका

Spread the love

मुंबई  : वक्फ बोर्डाची जमीन आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर इम्तियाज जलील यांनी काढलेली रॅली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवूनही अखेर मुबंईत पोहोचली आणि  मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा एमआयएमची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली. यावेळी वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुणी लाटली? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला विचारला  तर एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान औरंगाबाद ते मुंबई दरम्यान पोलिसांनी दिवसभर अनेक ठिकाणी खा. जलील यांच्या रॅलीतील वाहनांना अडवून तपासणी केली. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांसोबत बाचाबाची झाली तर कुठे समर्थकांना परत पाठवण्यात आले. पण, जलील आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झालेच. मुंबईतील चांदिवलीमध्ये एमआयएमची जाहीर सभा पार पडली. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन  ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी या दोन्ही भावांची जोरदार भाषणे  झाली. तर जलील यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट हल्लाबोल चढवला.

मराठा मोर्चाचे कौतुक

मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांचे मराठा नेते  मैदानात उतरले होते. मात्र मुस्लीम आरक्षणासाठी कोणत्याही मुस्लिम नेत्याने साथ  दिली नाही, असे सांगून जलील म्हणाले कि , अनेक अडथळे  पार करून मी मुंबईत आलो. पण इमानदारीचा प्रयत्न नेहमी यश देतो. काही फिल्म दाखवून मुस्लिमांना कसे  वापरले जात आहे ते मी दाखवणार आहे. त्यामुळे  समाजातील लोकांसाठी १०० नाही २०० टक्के राजकारण करणार आहे. या रॅलीत लोक स्वतः इथे आले आहेत कुणालाही गाडी नाही दिली, कुणालाही पेट्रोल नाही दिले, असेही जलील म्हणाले.मुस्लिम समाजातील अनेक बांधवांची हक्काची असलेली वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुठे गेली. ९ जणांवर गुन्हे आता दाखल केले आहे. पैशांच्या जोरावर जमिनी हडपल्या. त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत, असा खुलासाही जलील यांनी केला.

खासदार असदुद्दीन  ओवेसी

दरम्यान  या सभेत भाषण करताना ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी करताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार  टीका केली. ते म्हणाले कि , “मुस्लीम आरक्षणासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा रॅली काढली म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला काय त्रास झाला की त्यांनी जागोजागी ही रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीची खंत वाटतेय. शिवसेना २४ तासात राष्ट्रवाद म्हणून दोन हजारवेळा घोषणा करते तीच शिवसेना तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद आहे हे कसं विसरते? तिरंगाच आपल्या देशाची ओळख आहे. या तिरंग्याचा इतका का देश वाटतो? तुम्हाला मुसलमानांचा द्वेश असू शकतो, पण तिरंगा उचलल्यावर द्वेश वाटतो. तिरंगा भारताची ओळख, आमच्या प्रेमाची निशाणी आहे, तसेत आमच्या पूर्वजांच्या आहुतींचा सन्मान आहे”, असं ओवेसी म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी या महिन्यात मुंबईचा दौरा करणार आहेत. त्या मुद्द्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला. “रॅलीचा कार्यक्रमाची आयोजित केला म्हणून जमावबंदी लागू केली. आम्ही ठाकरे सरकारला विचारु इच्छितो, या डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष जे अमेठीतून पराभूत झाले आणि केरळमधून निवडून आले ते मुंबईत येणार आहेत. तेव्हाही कलम १४४ लागणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार? तेव्हा ओमायक्रोन राहणार नाही?”, असा सवालही  ओवेसी यांनी केला.

आता बघा बसून कोण दाबून खात आहे

“मुस्लीम आरक्षणाच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वक्तव्य केले होते. मुंब्राचे आमदार तर म्हणाले की, आमच्या तोंडाचं जेवण उचललं. त्यानंतर आमच्या महाराष्ट्राचा निर्मळ मुसलमान खूश झाला. ते आमचं जेवण परत करण्याबद्दल बोलत आहेत. त्यासाठी आम्ही उपाशी राहून त्यांना मतदान केलं. पण जेव्हा जिंकून आले तेव्हा त्यांना मुसलमान दिसत नाहीत. आता टेबलवर तीन लोक दाबून खात आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे कोण आहेत ते माहिती नाही. यांना जेवण देण्यासाठी तुम्ही उपाशी राहिलात. आपल्या मुलांबाळांचा विचार नाही केलात. आता बघा बसून कोण दाबून खात आहे”, असा घणाघात ओवेसी यांनी केला.

‘बाबरी मशिद पाडल्यानंतर…’

“बाबरी मशिद पाडल्यानंतर जो रस्त्यावर रक्तपाताची होळी खेळली गेली त्याने तुमचे डोळे उघडतील. पण त्यांनी आमच्या तरुणांना अटक करुन जेलमध्ये सडवलं. त्यांच्या तरुणपणाला तिथेच बरबाद केलं. इथल्या राजकारणावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही विसरलात की प्रत्येक निवडणुकीत सेक्युलरीझमची भाषणं केली गेली. त्यातून काय मिळालं? त्यापासून आरक्षण मिळालं का? सेक्युलरीझममुळे मशिद पाडणाऱ्यांना शिक्षा झाली का? नाही मिळाली. सेक्युलरीझमच्या दाव्यावर मुसलमानाला न्याय मिळाला नाही. मी संविधानाच्या सेक्युलरीझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलरीझमला मानत नाही”, असं ओवेसी म्हणाले.

‘महाराष्ट्रात केवळ ४.९ टक्के मुस्लीम सुशिक्षित’

“मुंबई हायकोर्टाने सांगितलंय की, महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार ते विसरलं. ते मराठा आरक्षणाची गोष्ट करतात. महाराष्ट्रात किती मुस्लिम पदवीपर्यंतचं शिक्षण घेतात? 30 टक्के देखील नाहीत. महाराष्ट्रात फक्त 4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित आहेत. 25 टक्के मुसलमान वर्षाला 25200 कमवतात. 3 लाख 60 हजार वर्षाला कमाई करणारे शून्य टक्के आहेत. मराठ्यांची वार्षिक कमाई आकडेवारी मात्र वेगळी आहे. कमाईमध्ये मराठ्यांची कमाई खूप जास्त आहे. मराठा IAS अधिकारी अनेक, मुसलमान एकही नाही. मंत्रालयात मराठा 28 टक्के आहेत. मराठा आणि मुसलमान समाजात मोठी तफावत आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण आणि मुसलमान मात्र वंचित”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संघ परीवारावरही टीका

“मुसलमानला शिक्षण घ्यायचं आहे. पण हे संघ परीवाराचे लोक खोटं बोलत आहेत की, मुसलमानला शिकायची इच्छा नाही. मुसलमान का शिकू शकत नाही? कारण त्याच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत”, असं ओवेसी म्हणाले, तसेच “शिवसेना सेक्युलर नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांवर आम्हाला गर्व आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना हे चालतं का ? काँग्रेस काही दिवसात नामशेष होईल”, असा घणाघात ओवेसी यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!