MaharashtraRainUpdate : मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात थोड्याफार प्रमाणात गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूरातील अनेक धरणे यावर्षी भारत आली आहेत. तर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आता पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. येथील बहुतांशी जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
दरम्यान उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. पुण्यासह पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी उद्या मात्र पुण्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. पण त्यानंतर पुढील सलग तीन दिवस पुण्यात वेगवान वाऱ्याच्या साथीने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आजपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता जवळपास नाही. पण काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.