MaharashtraExamUpdate : आरोग्य विभागात भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची थट्टा , आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

औरंगाबाद : राज्य शासनाकडून आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेतील सावळ्या गोंधळाचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे दोन वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराला एकाच दिवशी एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी हॉल तिकिट पाठवले आहे . आता हि परीक्षा कशी द्यायची ? असा पेच संबंधित उमेदवाराला पडला आहे. या उमेदवाराने “महानायक ऑनलाईन”ला याबाबत माहिती देऊन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा गोंधळात गोंधळ उजेडात आणला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री नांदेड येथील कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून उमेद्वारांवरील अन्याय दूर करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांनी दोन वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र शुल्क भरल्या आहेत.
‘महानायक ऑनलाईन’ कडे तक्रार केलेले उमेदवार सिद्धार्थ पानवाले यांनी टेलिफोन ऑपरेटर आणि हाऊस किपर या दोन स्वतंत्र जागांसाठी स्वतंत्र अर्ज केले होते . त्यानुसार त्यांना हॉल तिकीटही प्राप्त झाले मात्र या दोन्हीही परीक्षा दि . २५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरातील दोन वेगवेगळ्या केंद्रावर दुपारी ३ ते ५ या वेळेत होईल असे दर्शविण्यात आले आहे. त्यापैकी एक परीक्षा केंद्र एमआयटी माध्यमिक विद्यालय सिडको येथे आहे तर दुसरे केंद्र शंभूराजे उच्च माध्यमिक विद्यालय , सातारा परिसर येथे दर्शविण्यात आले आहे. आता एकच विद्यार्थी दोन ठिकाणी कसा उपस्थित राहणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अक्षयच्या हॉल तिकिटावर तर चक्क नोयडाचा पत्ता !
या शिवाय दि . २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या हॉल तिकिटातही संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय राऊत या उमेदवाराने वाशिम परीक्षा सेंट निवडलेले असताना त्याच्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशातील नोएडा हे परीक्षा केंदाचा पत्ता छापून आला आहे. त्यामुळे मी काय उत्तर प्रदेशात जाऊन पेपर देऊ का? असा उद्विग्न सवाल या परीक्षार्थीने आरोग्य विभागाला विचारला आहे.
दि . २५ आणि २६ सप्टेंबरला आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील ६२०० पदांसाठी राज्यात परीक्षा घेतली जात आहे. यासाठी तब्बल ८ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. आणखी एक तक्रार अशी आहे कि, अनेक परीक्षांर्थींचे हॉल तिकिटच डाऊनलोड होत नाही, तर काहींमध्ये प्रचंड चुका आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी या गोंधळात लक्ष घालावे अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत. ‘न्यासा’ या खासगी एजन्सीला या भर्तीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या हॉल तिकिटावरील माहितीमध्येही बऱ्याच चुका झाल्या असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. काही प्रवेश पत्रामध्ये कॉलेज कोणते आहे समजत नाही. कोणाच्या प्रवेश पत्रामध्ये वडिलांच्या नावाच्या जागी दुसऱ्याच व्यक्ती नाव आले आहे. काही परीक्षार्थींच्या लिंगाबाबत चुकीची माहिती दिली आहे. काहींच्या हॉल तिकिटावर फक्त कॉलेजच नाव आहे. जिल्ह्याचा पत्ताच नाही. अशा उमेदवारांनी सेंटरवर जायचे कसे ? याल जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.