Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : मुलांना सांभाळा : ओडिशामध्येही लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना करोनाची लागणझाली असल्याचं वृत्त असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार १ हजार ५८ नवे कोरोनाबाधित आढळले असून त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. या राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९ लाख ९४ हजार ५६५ पर्यंत पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या ६ हजार ८८७ इतकी झाली आहे. रविवारी कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ६१६ रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये १६२, जाजपूरमध्ये ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे २७ जिल्ह्यात १०० हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत मात्र एकही कोरोना रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात १६, कटकमध्ये १२, नयागरमध्ये १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी करोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!