Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून सव्वा लाखाची लूट

Spread the love

औरंगाबाद- गुरुवारी सकाळी १०,३०च्या सुमारास माळीवाडा परिसरातील हर्ष पेट्रोल पंप दोन लुटारुंनी कर्मचार्‍यांना पिस्तुलाचा आणि चाकूचा धाक दाखवून सव्वालाख रु. लूटून नेल्याचा गुन्हा दौलताबाद पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. लूटारु नेवासा रस्त्याकडे पळून पुढे गंगापूर कडे जाण्याची शक्यता पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. काल याच लूटारुंनी जालना येथे परमिट रुम समोर दोघांना लुटल्याचे सीसी.टिव्ही.फुटेजही पोलिसांना मिळाले आहे.

दोन इसमांनी पेट्रोलपंप लूटत असतांना पिस्टल आणि चाकूचा वापर केल्याचे सी.सी.टि.व्ही. मधे दिसते आहे.रक्कम लुटुन नेत असतांना कर्मचार्‍यांनी कसलाही विरोध केला नाही.गुन्हा घडल्यानंतर प्राप्त झालेल्या सी.सी.टि.व्ही फुटेज मधे एक संशयित कार दिसली तिचाही शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाणे, गुन्हे शाखा यांची दहा पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झालेली आहेत.तसेच जालना पोलिसही आरोपींच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शंकर घोगरे(२१) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

घटना घडली त्यावेळी हर्ष पेट्रोल पंपच्या कार्यालयात सकाळी कर्मचारी पैसे मोजत होते. या दरम्यान, स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांनी पेट्रोल पंपावर मध्यभागी गाडी लावली आणि पंपाच्या कार्यालयाकडे शांतपणे चालत गेले. त्यांच्यावर कोणाचाही संशय नव्हता. कार्यालयाच्या दरवाजात पोहचताच अचानक एकाने कंबरेचे पिस्तुल काढत आतील पैसे मोजणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर रोखले. तर दुसऱ्याने धारदार शस्त्र दाखवत जवळच्या पिशवीत पैसे टाकण्यास सांगितले.

या घटनेत या दोन चोरट्यांनी एकूण १ लाख २६ हजार रुपये घेऊन जणू काही घडलेच नाही असे बाहेरच्या लोकांना भासवून पोबारा केला.शिवाय दुचाकीवर बसताच पेट्रोल पंपाला वळसा घालून ते औरंगाबादच्या दिशेने निघून गेले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंपाचे मालक आशिष काळे, दिलीप चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजवरून या दोन्हीही चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पंपावर येत रेकी केली असल्याचे सिसिटिव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला येताना त्यांनी तोंडाला काहीही बांधलेले नव्हते. यावरून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!