Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : खा. राजीव सातव यांच्या निधनाने हळहळ , अनेकांची आदरांजली !!

Spread the love

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या  निधनाने केवळ काँग्रेस पक्षालाच नव्हे तर एकूणच राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या या तरुण आणि उमद्या नेत्याच्या निधानाने काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच इतरही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव यांनी गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती, असेही पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

अशोक चव्हाण 

आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे, असे म्हटले आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, असे म्हणत फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.

माणुसकी जपणारा नेता गेला- सुप्रिया सुळे

काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!