Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढत संसर्ग , बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स स्थापनेची तयारी

Spread the love

मुंबई :  लहान मुलांमध्ये करोना संसर्गाचे  प्रमाण वाढत असल्याचे  निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात तातडीने बालरोग तज्ज्ञांचा  टास्क फोर्स स्थापन करण्यात येत असल्याची  माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

टोपे म्हणाले कि , राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने निर्माण केला जाईल. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल, असे ते म्हणाले. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला असल्याचेही  टोपे म्हणाले.

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात रशियातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे. जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायचे आहेत. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर ३ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!