Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : गृहमंत्र्यांचे वाझेला दरमहा १०० कोटींचे टार्गेट !! परमबीर सिंह यांच्या आरोपाने राजकीय भूकंप 

Spread the love

मुंबई  |  वाझे -परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे . दरम्यान  सचिन वाझे यांना गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप नुकतेच परमबीर सिंह यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटवून त्यांची बदली गृहरक्षक दलाचे प्रमुख म्हणून केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे वादग्रस्त पत्र लिहिले आहे.

आयपीएस पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ८ पानी दीर्घ पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. या पत्रात सिंग यांनी अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना मंत्र्यांनी कशा प्रकारची टार्गेट्स दिली होती, याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या बरोबर कोणी कोणी वाझे यांना काय काय सांगितले होते, याबाबतची धक्कादायक माहितीही त्यांनी  या पत्रात नमूद केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर मोठ्या अस्थापनांकडून प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असे परमबीर सिंग यांनी या तक्रारवजा पत्रात म्हटले आहे. एवढी मोठी वसुली करण्याचे दर महिन्याला त्यांना टार्गेटच देण्यात आले होते असे पत्राच म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून परमबीर सिंग यांनी हे तक्रारवजा पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात एकूण २३ मुद्दे लिहिले आहेत.

गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप

दरम्यान ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते’ असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने आपले  म्हणणे  मांडत परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावसाठी हा खोटा आरोप केला आहे, असा पलटवार देशमुख यांनी केला आहे. ‘मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरन हत्या प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून व्यक्त होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे’, असे  देशमुख यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात देशमुखांच्या बाजूने

दरम्यान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा गृहविभाग चांगले काम करीत आहेत. विरोधासाठी विरोध म्हणून विरोधी पक्षाकडून काहीही बातम्या पेरल्या जात असल्या तरी देशमुख यांच्याकडील गृहखाते जाणार नाही, असा आपल्या विश्वास वाटतो,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपची टीका

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनीच असे गंभीर आरोप केल्यानंतर भाजपनेही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आता हे स्पष्ट झालं आहे की हे सरकार भ्रष्ट आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!