IndiaNewsUpdate : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा जोडले केंद्राला हात , म्हणाले कृषी कायदे परत घ्या…

मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी बिलांच्या विरोधात चालू असलेल्या सिंघू सीमेवरील हजारो आंदोलक शेतकर्यांच्या भेटीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा पोहोचले. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी यांनी रविवारी केंद्र सरकारला पुन्हा कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी आंदोलन करत आहेत. मी कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना आव्हान देतो की त्यांनी शेतकर्यांशी खुली चर्चा करावी. त्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल की कृषी कायदे फायद्याचे आहेत की तोट्याचे आहेत.
यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही उपस्थिती होती. या भेटीच्या आधी दि . ७ डिसेंबर रोजी केजरीवाल दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकर्यांना भेटायला गेले होते. शेतकरी आपल्या जीवनासाठी आंदोलन करत आहेत. हा कायदा त्यांची जमीन काढून घेईल. कृपया हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी मी हात जोडून केंद्राला आवाहन करतो, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकर्यांना सांगितले की, आम्ही सर्व बंदोबस्तावर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला (शेतकर्यांना) कमी त्रास होईल याची खात्री करुन घेत आहोत. अरविंद केजरीवाल यांनी सरकारकडून केलेल्या सोईसुविधांचा यावेळी आढावा देखील घेतला.