Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : जाणून घ्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम

Spread the love

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (शुक्रवार) केली.

मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४, हजार २३४

आपलं सरकार

Click to listen highlighted text!