Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , लाडक्या नेत्याला दिला साश्रू नयनांनी निरोप….

Spread the love

लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मात्र, या दरम्यान चिराग पासवान दु:खावेगानं बेशुद्ध होऊन कोसळले. यावेळी इथं उपस्थित असलेल्या लोकांनी चिराग यांना सावरलं. दीघा घाटावर आपल्या या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी कोरोनाकाळातही हजारोंच्या संख्येनं त्यांचे समर्थक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी जनता उपस्थित होती.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुशील मोदी ,  माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी प्रमुख  नेत्यांची उपस्थिती होती. भाजप खासदार रामकृपाल यादव हेदेखील पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहचले. यावेळी रामकृपाल यांना पाहताच चिराग पासवान यांनी त्यांना आलिंगन देत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. चिराग पासवान यांची ही स्थिती पाहून रामकृपाल यादव देखील आपले अश्रू आवरू शकले नाहीत. चिराग पासवान यांच्यासोबत त्यांची आई रीना याही दीघा घाटावर उपस्थित होत्या. रामविलास पासवान हे मूळचे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शराबान्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. रीना – रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही  दिवसांपासून ते आजारी होते . त्यांच्यावर उपचार चालू असतानाच  गुरुवारी सायंकाळी त्यांचं एस्कॉर्ट रुग्णालयात निधन झालं होतं. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजल्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव दिल्लीहून पाटण्याला दाखल झालं होतं. विमानतळावरही रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी पासवान यांचं पार्थिव पाटणा स्थित लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं.  दैनिक महानायकशीही रामविलास पासवान यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी प्रत्येकवेळी महानायक कार्यालयाला भेट दिली होती. महाराष्ट्रावरही त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!