IndiaNewsUpdate : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक शेखर कपूर एफटीआयआयच्या चेअरमनपदी

सिने अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे देणाऱ्या प्रख्यात FTII संस्थेच्या अध्यक्षपदी आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातली घोषणा केली आहे. ३ मार्च २०२३ पर्यंत शेखर कपूर यांचा कालावधी असेल असंही जाहीर करण्यात आलं आहे. या आधी डिसेंबर २०१८ मध्ये बी.पी. सिंग यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
शेखर कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतले अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मासूम हा सिनेमा दिग्दर्शित करत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्याआधी त्यांनी दिग्दर्शित केलेली खानदान ही मालिका चांगलीच गाजली. मासूम हा सिनेमा केल्यानंतर त्यांनी मिस्टर इंडिया हा सिनेमाही दिग्दर्शित केला. बॅंडिट क्वीन हा फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित सिनेमाही त्यांनी दिग्दर्शित केला आहे. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी एलिझाबेथ, द फोअर फिदर्स, एलिझाबेथ द गोल्डन एज, न्यूयॉर्क आय लव्ह यू आणि पॅसेज यांसारखे सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. शेखर कपूर हे सध्या एलिझाबेथ सीरिजमधला तिसरा पार्ट तयार करत आहेत. एलिझाबेथ द डार्क एज असं या सिनेमाचं नाव आहे.