Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshCrimeUpdate : हाथरस येथील ” त्या ” पीडित मुलीच्या मृत्यूचे देशभर पडसाद

Spread the love

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर मंगळवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर तिची  प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर काल मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणीने चार तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचं कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केलं होतं. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली एम्समध्ये रेफर होण्यापूर्वी जेएनएमसीचे अधीक्षक डॉक्टर हॅरिस मंजूर खान यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले होते की, पीडिता व्हेंटिलेटरवर आहे. पीडितेच्या पायांना आणि हाताला अर्धांगवायू झाला होता. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे समजून तिच्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्या उपचारासाठी दिल्ली येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान पीडित मुलीची हत्या करण्यात आली असून  या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे . या प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत.

हाथरसच्या चांदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान  हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले  की , या  सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संदीप , रामू , लवकुश आणि रवि अशी त्यांची  नावे आहेत.याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामुहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले.

या मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, “त्यांच्या घराजवळ राहणारा २० वर्षीय सवर्ण समाजातील तरुण आणि त्याचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देत असतात.” यातील आरोपी संदीपच्या आजोबावरही ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे . पीडित मुलगी ज्या गावामध्ये राहते त्या गावात एकूण ६०० कुटुंबांपैकी केवळ १५ दलित कुटुंब आहेत. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

दि . १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती.  १५ दिवसांपूर्वी हाथरसमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. मात्र प्रारंभी हे प्रकरण गांभीर्याने न घेता ” फेक न्यूज ” म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते असा आरोप काँग्रेसनेत्यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणाचा देशभर निषेध करण्यात येत असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे . या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. तर बसपाच्या नेत्या  मायावती यांनी या प्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करून खैरलांजी घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी हि घटना घडल्याचा उल्लेख आपला ट्विट मध्ये केला आहे. आमची मुल्गी गेली असे भावनिक ट्विट करताना त्यांनी म्हटले आहे कि ,या प्रकरणाचा गतीने न्याय देण्यात यावा.

या घटनेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकले.” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. “उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकले. सरकारने म्हटले की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिले. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता.” असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर जयंत पाटील यांनी दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले,”जिथे माता गंगा, माता जमुनाची संस्कृती वास्तव्य करते. ज्या भूमीचं प्रतिनिधित्व स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्व. कांशीराम आणि कित्येक महान नेत्यांनी केलं. त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं. मला आशा आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याची गंभीर दखल घेतील आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देतील,” अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विट करून केली आहे.

सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही तीव्र प्रतिक्रिया

या घटनेवर बॉलिवूडमधील कलावंतांनाही आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून यामध्ये रितेश देशमुख , अक्षयकुमार , रिचा चड्ढा , हुमा कुरैशी , फरहान अख्तर , विजय वर्मा , क्रिकेटर विराट कोहली यांनीही या घटनेचा निषेध केला असून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मंगळवारी  दिवसभर या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी , समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव , कम्युनिस्ट नेते , मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेची निंदा केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!