Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : संतपीठ जानेवारीपासून सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Spread the love

वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राची संत परंपरा जपणारे संतपीठ पैठण नगरीत जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. या संतपिठास जगद्गुरु संत एकनाथांचे नाव असेल, असेही ते म्हणाले.

पैठण येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या संतपीठ इमारतीत मंत्री श्री. सामंत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.
मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित असे हे संतपीठ आहे. या संतपिठास 22 कोटींचा निधी अपेक्षित आहे. विद्यापीठ निधीतून या प्रकल्पाची सुरुवात होईल. बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेची पैठण नगरीत संतपीठ सुरु करण्याची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्राथमिकता दिली, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो. तसेच या संतपिठातून जानेवारीपासून तबला, पखवाज वादन, संवादिनी गायन, पदवी, पदविका आदी अभ्यासक्रम देखील सुरु होतील. याबाबतची सर्व कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. या संतपिठातून संत परंपरेच्या अभ्यासक, संशोधकांसाठी स्वायत्त दालन खुले होईल. परदेशातील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाही या संतपिठाचा फायदा होईल. महाराष्ट्रातील संत परंपरा जपणुकीसाठी हातभार लागेल. या संतपिठासाठी आवश्यक ज्येष्ठ वारकरी अभ्यासक, तज्ज्ञांची सल्लागार समिती देखील सर्वसमावेशक विचारातून गठित करण्यात येईल. या संतपिठाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये होत असल्याने मनापासून आनंद होत असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी त्यांनी जायकवाडी जलाशयाची पाहणी केली. त्यानंतर संतपिठाची पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!