Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : रिपब्लिक भारत टीव्हीच्या संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सेनेची मागणी

Spread the love

रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछुट आरोप लावल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिले. अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिकन भारत ही वाहिनी खळबळजनकरित्या बेजबाबदार बातम्या प्रसारीत करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या  निवेदनात आ. दानवे यांनी म्हटले आहे कि , पत्रकारितेच्या नावाखाली रिपब्लिकन भारत ही वाहिनी सतत बेजबाबदार बातम्या प्रसारीत करत आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछुट आरोप लावण्यापर्यंत या वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची मजल गेली आहे. बातम्या प्रसारीत कताना यापुर्वी देखील गोस्वामी यांनी राजकीय नेत्यांवर अश्लाघ्य शब्द वापरले आहेत. त्यामुळे नेत्यांचे चारित्र्यहनन झाले. गोस्वामी यांच्याविरुध्द यापुर्वी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका मृत महिलेबाबत आरोप करताना त्यांनी पत्रकारितेची सीमा ओलांडली होती. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहनन त्यांच्याकडून घडले आहे. महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला होता. प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाने पत्रकारितेबाबत व बातम्या प्रसारीत करण्यासंदर्भात काही मर्यादा आखल्या आहेत. मात्र, ही वाहिनी व विशेषत: वाहिनीचे मुख्य संपादक गोस्वामी हे अत्यंत वाईट पध्दतीने आचारसंहितेचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेस कॉन्सिलने दिलेल्या कलम २५ व ३५ चे वाहिनीने उल्लंघन केले आहे.

काही जणांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह््यांसंदर्भात विभाजक व बेजबाबदार बातम्या खळबळजनकरित्या प्रसारीत करुन गोस्वामी हे समाजात तेढ निर्माण करत आहेत. लोकांना चिथावणी देण्याचे काम करत असल्याने राज्यात कायदा व सुव्यस्थेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिध्द करणे त्या गुन्ह््याचा तपास करणा-या अधिकृत यंत्रणेच्या कामात अडथळा आणू शकतो. त्यामुळे ख-या गुन्हेगाराला सुरक्षितस्थळी पळविण्यासाठी मदत होते. पोलिस खात्याचाही वाहिनीने वेळोवेळी अपमान केला आहे. एवढ्यावरच न थांबता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन धमकावले आहे. असे वागताना त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह व संतापजनक आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्याची वाट पाहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी आणि सुशील खेडकर यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!