Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratPolitical : तीन आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ, भाजपवर टीकास्त्र

Spread the love

देशात आणि गुजरातमध्ये कोरोनाचे वातावरण असले तरी गुजरातमध्ये मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १९ जून रोजी होणाऱ्या निवडणुकी अगोदर काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावधतेची भूमिका घेत आपल्या ६५ आमदारांना तीन रिसॉर्टमध्ये ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. या मागे काँग्रेसचे आणखी आमदार फुटू नये व राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ आणखी कमी होऊ नये अशी भूमिका असल्याचे दिसत आहे.

दरम्यान काँग्रेसने तीन गटात आपल्या आमदारांची विभागणी केली असून, गुजरातमधील अंबाजी, राजकोट आणि वडोदरा या ठिकाणच्या रिसॉर्टवर त्यांना ठेवले असल्याचे वृत्त आहे. तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, २०१७ मधील पाटीदार आंदोलनातील त्यांचे जवळचे सहकारी आमदार बृजेश मेरजा यांनी दिलेल्या राजीनाम्यावर त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. “मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलेने  मारायला हवे. मला विश्वास आहे की जनता या धोकेबाज आमदारांना पोटनिवडणुकीत चांगला धडा शिकवील, जसे की जनतेने या अगोदरही केलेले आहे.” असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. या आठवड्यात वडोदराच्या कर्जन येथून आमदार अक्षय पटेल, वलसाडच्या कप्रदाचे आमदार जीतू चौधरी आणि मोरबीचे आमदार बृजेश मेरजा यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसला आहे.

हार्दिक पटेल यांनी आमदारांच्या राजीनाम्यावर म्हटले आहे की, भाजपा राज्यसभा निवडणूकीत बहुमत मिळवण्यासाठी होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. निवडणुकीअगोदर काँग्रेस आमदारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे लोकसभेत संख्याबळ आहे. मात्र, राज्यसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आपल्या जास्तीत जास्त नेत्यांना त्यांना विजयी करायचे आहे. हार्दिक पटेल यांनी हे देखील सांगितले की, आता ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांबद्दल भूमिका स्पष्ट करावी व अशा नेत्यांवर कारवाई करून एक उदाहरण निर्माण करावे. जेणेकरून जनतेचा लोकशाहीवरील विश्वसा कायम राहील. जे आमदार आपल्या मतदारांचा विश्वासघात करून पक्ष बदलतात, त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हायला हवी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!