Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर निधन, प्रवीण बर्दापूरकरांच्या ‘बेगम’ची एक्झिट…. !

Spread the love

ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले . मुळच्या नागपूरच्या असलेल्या मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर १९८० आणि ९० या दोन दशकातील मराठीतील अग्रगण्य महिला पत्रकार होत्या ; गेल्या पांच वर्षांपासून त्या औरंगाबादला स्थायिक होत्या . नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणी आणि याच दैनिकाच्या महाराष्ट्र आवृत्तीचे संपादकपद त्यानी सांभाळले होते . १९८३ ते १९९० या काळात  ‘लोकसत्ता’च्या नागपूर येथील वार्ताहर म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे . मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांनी विविध वृत्तपत्रे , नियतकालिके आणि आकाशवाणीसाठी विपुल लेखन केलेले आहे . गेल्या चार वर्षापासून त्या पक्षाघात आणि असाध्य पार्किन्सनने आजारी होत्या . मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या पश्चात,  पती ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर , विवाहित कन्या सायली , जावई दीपक ग्यानानी , भाऊ श्रीकांत आणि खूप मोठा आप्त व मित्र परिवार आहे . मंगला बर्दापूरकर यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात  आले. यावेळी विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “महानायक” परिवार आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.

प्रवीण बर्दापूरकरांच्या “बेगम ” चे जाणे…आणि प्रवीण यांनी ‘व्हॅलेंटाईन’ डे’च्या निमित्तानं फेसबुकवर व्यक्त केलेली आठवण 

बर्दापूरकरांच्या ‘बेगम’ची कथा !

खरं तर , या विषयावर फार पूर्वी एकदा एक छोटासा मजकूर लिहिला होता पण , आता शीतल आमटे Sheetal Amte-Karajgi म्हणाली म्हणून पुन्हा एकदा-

विवाहाच्या आधी प्रेमाचं सूत जुळल्याच्या काळात आणि विवाहानंतर ३/४ वर्ष मी मंगला( पूर्वाश्रमीची विन्चुर्णे )ला  ‘मंगू’ असं संबोधत असे .

तेव्हा माझं भाषक अज्ञान अनुभवतांना ती मला अनेकदा ‘धोंडा’ म्हणत

असे , हेही जाता जाता सांगून टाकलं पाहिजे !

माझा धाकटा भाऊ विनोद औरंगाबादला दंत महाविद्यालयात आणि त्याची पत्नी ज्योती ( पूर्वाश्रमीची खडके ) औरंगाबादच्याच शासकीय वैद्यक महाविद्यालयात ग्रंथपाल होती . त्या दोन्ही इमारती एकाच परिसरात , अगदी गळ्यात हांत टाकून उभ्या , इतक्या शेजारी . शिवाय दोघेही चांगले वाचक . स्वाभाविकच सूत जुळायला वेळ लागला नाही .

त्यांना एक मुलगी ; तिचं नाव सुखदा .

सुखदा बालपणी महाबडबडी , गोरीपान आणि गब्दुली होती  .

तेव्हा ज्योती आणि विनोद त्यांच्या महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या विद्युत कॉलनीत राहत .

ही कॉलनी ‘बीबी का मकबरा’ला खेटून आणि शेजारीपाजारी मुस्लीम जास्त ; माझं स्मरण पक्कं असेल तर सुखदाला सांभाळणारी बाईही बहुदा मुस्लीम होती .

( निझाम राजवटीमुळे मराठवाड्यातल्या आमच्या पिढीपर्यंत मुस्लीम संस्कृतीचा प्रभाव होता . मला तर पहिलीत उर्दू माध्यम आणि बहुदा तिसरीपर्यंत उर्दू भाषा होतीच .

या भाषेची नजाकत आणि आदब विलक्षण मोहक आणि मुलायमही पण , उर्दू  शिकायचं नंतर राहून गेलं ते गेलंच .)

त्या वातावरणामुळे सुखदाच्या  बोलण्यात कुठे आणि केव्हा तरी ऐकलेला बेगम हा शब्द आला असणार .

एकदा नागपूरला आल्यावर ती मंगलाला काकू म्हणण्याऐवजी ‘बेगम काकू’ म्हणू लागली . ते मला खूपच आवडलं .

आपण अंधारात बसलेलं असावं आणि अचानक समोरचं झाड लख्ख दिव्यांनी उजळून निघावं , तसं मला सुखदानं उच्चारलेल्या  ‘बेगम’ या शब्दाला एक लय , आत्मीयता आणि सहजीवनाची उत्कटता आहे ,       असं जाणवलं आणि तेव्हापासून मी मंगलाला बेगम या नावानं संबोधनं सुरु केलं .

मराठीचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी इतर भाषांचा मी द्वेष्टा नाही .

अन्य भाषेतल्या अनेक शब्दांनी मला भुरळ घातलेली आहे ; बेगम हा शब्द त्यापैकी एक आहे .

‘व्हॅलेंटाईन’ डे’च्या निमित्तानं आमची प्रेमकथा ‘सांजवार्ता’ या सायं दैनिकात प्रकाशित झाल्यावर मी माझ्या पत्नीला बेगम म्हणणं अनेकांना अमान्य

आहे असं लक्षात आलं पण , त्यांच्या त्या अमान्य असण्याला फार कांही अर्थ नाही .

कोणाही पत्नी आणि पतीनं एकमेकाला कोणत्या नावानं संबोधावं हा त्यांचा अधिकार आहे .

इतरांनी त्याबद्दल राजी-नाराजी व्यक्त करण्याचा मुद्दाच उदभवत नाही !

-प्रब

( १९ फेब्रुवारी २०२० )

आपलं सरकार

Click to listen highlighted text!