Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

Spread the love

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्यानुसार राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. या यादीत नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावांतील शेतकऱ्यांना तूर्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. बाबुडी घुमट व विळद अशी या दोन गावांची नावे आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ४४९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्वावरील यादी २४ फेब्रुवारी रोजी लावण्यात आली होती. त्यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आले होते. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४  समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

याविषयी माहिती देताना सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे कि , ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येत आहेत. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील उद्देश आहे. ‘पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही’, असेही त्यांनी नमूद केले होते.

 

औरंगाबाद -जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस 

दरम्यान औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबडला अवकाळी पावसाने दणका दिला आहे. औरंगाबाद शहरातही रात्री पाऊस सुरू झाला आहे. वाळूज, सिल्लोडसह जवळपासच्या संपूर्ण परिसरात पाऊस धडकला असून या पावसाने बळीराजा धास्तावला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचा दिलासा मिळत असताना अवकाळी पावसाचे संकट बळीराजाच्या दारात उभे ठाकले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!