कोल्हापूरकरांकडून का ट्रोल होताहेत चंद्रकांत पाटील ?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या सोशल मीडियावर कोल्हापूरकरांकडून तुफाहन ट्रोल होताहेत . विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि कोल्हापूरमधून अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल त्यांनी हा निकाल अनाकलनीय असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती . या पत्रकार परिषदेत केलेल्या कथित वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, त्यावर स्वतः चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर माझी बदनामी करण्यात येत असल्याचं म्हटलं असून कोल्हापूरबाबत तसं वाक्य मी झोपेतही उच्चारु शकत नाही असं स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्याविरोधात सूर कमी होताना दिसत नाही. “पत्रकार परिषदेत मी व्हॉट्सअपवर आलेला मेसेज वाचून दाखवला. त्यातल्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही”, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे. “कोल्हापुरातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात मी व्हॉट्सअॅपवरील एका मेसेजचा संदर्भ दिल होता. पण, त्या मेसेजमधील शेवटच्या वाक्याशी मी कदापीही सहमत नाही. या एका वाक्यावरून माझी सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे”.
विधानसभा निवडणूक निकालानंतर काल दिवाळीच्या दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. कोल्हापुरात महायुतीच्या जागा आठ वरून एकवर आल्याची कारणमीमांसा करताना पाटील यांनी एका व्हॉट्स अॅप मेसेजचा संदर्भ देत भूमिका मांडली. त्या मेसेजमध्ये भाजपाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी होती. भाजपाने अंबाबाई मंदिर, कोल्हापूरचे विमानतळ, रेल्वे सेवा याविषयी कामं केल्याचे संदर्भ देण्यात आले होते. तसेच टोल आणि एलबीटी रद्द केल्याचाही उल्लेख होता. इतकं करूनही कोल्हापूरकरांनी भाजपा-शिवसेनेला नाकारलं, असं सांगत ‘सगळं जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही,’ या वाक्यानं मेसेजचा शेवट झाला. याच वाक्यामुळे पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. त्यावरुन आता पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तरीही कोल्हापूरकरांचे समाधान होताना दिसत नाही.