Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा : काँग्रेसच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला मिळतील इतक्या जागा

Spread the love

राज्यातील २८८ जागांच्या मतदानानंतर निकालाला दोन दिवसांचा अवकाश असल्याने कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज बांधणारे जवळपास ६ एक्झिटपोल आले आणि या विषयावरील चर्चा रंगात आलेल्या असतानाच आता काँग्रेसचाही एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. काँग्रेसच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसने ८९ जागांवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेसला ५० ते ३५ जागा मिळतील, असं काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची माहिती आहे. खरोखरंच इतक्या जागा मिळाल्या तर सतत मानहानीकारक पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या काँग्रेससाठी हा दिलासा असणार आहे.

लातूर जिल्ह्यातून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी मैदानात असलेले दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख आपले नशीब आजमावत आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून देशमुख बंधूंसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याची चर्चा आहे. मात्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही या निवडणुकीत विजय होतील, असं काँग्रेसच्या सर्व्हेत म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला धप्पा  देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!