Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कंपनीचा कच्चामाल बदलून दहा लाखांची फसवणूक

Spread the love

औरंगाबाद-मुंबईदरम्यान कंपनीचा रिफाम्पीसीन हा कच्चामाल बदलून कंपनीची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चीनमधून हा कच्चामाल कंपनीला पुरविला जातो. क्षयरोगावरील औषधी त्यापासून तयार केली जाते. हा प्रकार १२ ते २६ आॅगस्ट २0१९ दरम्यान घडला.

चिकलठाणा एमआयडीसी भागातील कन्सेप्ट फार्मास्युटिकल्स कंपनीत सुमेध काकासाहेब गंगावणे (४५, रा. हडको, एन-११, नवजीवन कॉलनी) हे व्यवस्थापक आहेत. औषधी निर्मितीचे काम करत असलेल्या कंपनीने १२ जुलै २0१९ रोजी चीनमधील शेन्यांग अ‍ॅन्टीबायोटिक मॅन्युफॅक्चरर कंपनीकडून रिफाम्पीसीन हा कच्चामाल (क्षयरोगावरील औषधी) तयार करण्यासाठी कंपनीने पंधरा लाख रुपयात विकत घेतला होता.

हा कच्चामाल मुंबईच्या भिवंडीमधील अस्ट्रा फार्मा कंपनीने मागणी केल्यामुळे १२ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिडकोतील प्रोझोन मॉलजवळ असलेल्या टिसीआय एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टने मुंबईला पाठविण्यात आला. त्याबाबत कंपनीने १९ आॅगस्ट रोजी ई-मेलव्दारे कळविले की, पुठ्ठ्याच्या एकुण सहा ड्रममध्ये भरलेला कच्चामाल पोहोचला आहे. मात्र, त्यापैकी दोन ड्रमचे सील उघडलेले आढळुन आले आहेत. त्यानंतर अस्ट्रा फार्मा या कंपनीने मालाची तपासणी न करता तो विक्री केला. त्यांच्या प्रतिनिधीने तोच माल त्यांच्या पालघर येथील कंपनीत नेऊन ठेवला. २६ आॅगस्ट रोजी पुन्हा अस्ट्रा फार्मा कंपनीने ई-मेलव्दारे गंगावणे यांना कळविले की, आपण कंपनीला विकलेल्या मालाची यु. एस. फार्मा कंपनीने तपासणी केली. तेव्हा सहा सील बंद ड्रमपैकी चार ड्रममध्ये असलेला कच्चामाल हा पांढ-या रंगाचा आढळून आलेला आहे. जेव्हा की तो लाल रंगाचा असतो. त्यामुळे हा कच्चामाल वाहतुकीदरम्यान अथवा कंपनीने बदलला असल्याचा संशय गंगावणे यांनी व्यक्त केला आहे. त्यावरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अस्ट्रा फार्मा व ट्रान्सपोर्ट कंपनीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार चव्हाण करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!