उपमुख्यमंत्री पदाविषयी अद्याप काहीही ठरलेले नाही , जे ठरायचे ते निवडणुकीनंतर ठरेल : चंद्रकांत पाटील

भाजप सेनेच्या नेत्यांनी महायुती झाल्याचे संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले असले तरी एकमेकांच्या विरोधात निवेदन – प्रतिनिवेदन करणे थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री पदाविषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले कि , राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांच्या युतीचे सरकार येणार आहे. परंतु, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे अद्याप ठरवण्यात आले नाही. निवडणूक निकालानंतर याचा निर्णय होईल. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानानंतर पाटील यांनी हे विधान केले आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आजच्या सभेत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हे तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर पाटील यांनी तत्काळ हे विधान केले आहे. दरम्यान शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे कि , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महायुतीचे जागा वाटप आणि भाजपच्या उमेदवारांच्या यादीविषयी बोलताना ते म्हणाले कि , भाजपची यादी आज रात्री जाहीर करण्यात येणार आहे . शिवसेना भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. जागा वाटप पूर्ण झाले असल्याने आज रात्री कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. दरम्यान शिवसेना भाजप युतीत सेनेच्या वाट्याला किती जागा आल्या. भाजप किती जागावर लढणार तसेच मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात आल्या आहेत याविषयी कुठलीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही . उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून एकीकडे महायुती झाल्याचे सांगितले जात असताना काही जागांवरून वाद आहे हेच निदर्शनास येत आहे.