Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं निधन

Spread the love

ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. देशातील प्रख्यात वकील म्हणून त्यांची ओळख होती. तसंच राम जेठमलानी हे भाजपकडून राज्यसभा खासदारही होते. जेठमलानी यांनी ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्षपदही भूषविले होते.

राम जेठमलानी यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कायद्याची डिर्गी प्राप्त केली होती. त्यानंतर नियमांमध्ये संशोधन करून वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळाली. जेठमलानी हे विधिज्ञ म्हणून जेवढे चर्चेत होते तेवढीच चर्चा त्यांच्या वक्तव्यांचीही होत असे. राम जेठमलानी यांनी त्यांच्या वकिली पेशाच्या कारकीर्दीत अनेक मोठे खटले लढले. यातील काही प्रकरणांत तर मोठा वादही झाला. कारण राम जेठमलानी यांनी काही कुख्यात गुंडांचेही खटले लढले होते.

राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी, आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. त्यांची दुसरी कन्या राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. जेठमलानी यांची तब्येत खालावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

जेठमलानी यांचा ब्रिटिश राजवटीतील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे १४ सप्टेंबर १९२३ या दिवशी जन्म झाला. ते वयाच्या १८ व्या वर्षी वकील बनले. शाळेत शिकत असताना बढती मिळवत वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण केले. त्या काळात सर्वसाधारणपणे लोक वयाच्या २१ व्या वर्षी वकील बनत असत. मात्र जेठमलानी यांनी ही कमाल १८ व्या वर्षीच करून दाखवली. ही माहिती स्वत: जेठमलानी यांनी सन २००२ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली होती.

जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणी बचाव पक्षाचे वकील या नात्याने मद्रास हायकोर्टात सन २०११ मध्ये लढवले होते. तसेच त्यांनी शेअर बाजार घोटाळाप्रकरणी हर्षद मेहता याची बाजू लढवली होती. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुच्या फाशीच्या प्रकरणातही हे बचाव करत होते. बहुचर्चित जेसिकालाल हत्याकांड प्रकरणातही त्यांनी मनु शर्माची बाजू लढवली होती.

सन २०१० मध्ये जेठमलानी यांनी सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. सहाव्या आणि सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपद भूषविले होते. सन २००४ मध्ये त्यांनी लखनऊमधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांच्या खटले लढवले होते. याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरू, तसेच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले आहेत.

ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने असाधारण वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आठवणीत राहतील”, अशा शब्दात मोदी यांनी जेठमलानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!