Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपचा मोह सोडून अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीची पायरी चढून बांधले शिवबंधन

Spread the love

भाजपशी चर्चा करीत अखेर काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारी १२.३० वाजता खुद्द उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर सत्तारांना शिवबंधन बांधलं. भाजपच्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्य़ांसोबत रथात दिसणाऱ्या सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार सोडून  देत  सेनेचं शिवबंधन हाती बांधल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. आज सकाळीच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सत्तार समर्थकांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले होते.  सेनेच्या प्रवेशानंतर सिल्लोड हा त्यांचा मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी ही सत्तार यांच्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांवेळी सत्तार इतर जिल्ह्यांसाठीही काम करतील असंही  उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या आधी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. पक्षाविरुद्ध बंडखोरी केल्यामुळे अब्दुल सत्तार यांना काँग्रेसमधून  बडतर्फ करण्यात आलं होतं. अब्दुल सत्तार  भाजपमध्ये येत असल्याचे समजताच त्यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार यांनी  शिवसेनेची वाट धरली आणि शिवबंधनही बांधून घेतले.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे यात्रेच्या रथावरही गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. याआधी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून भाजप कार्यकर्ते आणि सत्तारांमध्ये वादावादीदेखील झाली होती त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी हा निर्णय घेतला आणि या वादावर पडदा पाडला .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!