Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मजूर शेतात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात , तीन ठार १३ जखमी

Spread the love

रोवणीसाठी मजूर घेवून जाणारा ट्रॅक्टर तालुक्यातील डव्वा जवळील नाल्यात उलटल्याने तीन ठार तर १३ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. भागवत लक्ष्मण गजबे (४४), ईश्वरदास मंगरू संग्रामे (२०), सावंगी येथील शोभा अनिल बनसोड (४०) अशी अपघातात ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत. अपघातातील सर्व जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

रविवारी सकाळी सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारीटोला येथे रोवणी करण्यासाठी सावंगी, नैनपूर, डुग्गीपार येथील २१ मजूर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी ८१६२ व विना क्रमांकाच्या ट्रालीमध्ये बसून जात असतांना कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ एफसी २३०९ ने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्टरला मागून  धडक दिली. यामुळे ट्रॅक्टर नाल्यात पडला. त्यात तीन जण ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पाणी त्यांच्या नाकातोंडात जावून त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक निलेश भागवत गजबे (२१) हा जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर नाल्यालगत असलेल्या शेतात काम करीत असलेले शेतकरी मदतीसाठी धावून गेले. जखमींना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

जखमींमध्ये सावंगी येथील विमल प्रल्हाद मस्के (५०), महानंदा भागवत वाढई (३५), भगवान येमा वाढई (४०), मक्कूबाई अंताराम काळसर्पे (६०), पुस्तकला रूपचंद काळसर्पे (६१), शालू नंदेश्वर काळसर्पे (३२), रूपचंद काळसर्पे (३२), मिरा राजेश मेश्राम (४०), कोकीला चिरंजीव बन्सोड (५५), कविता प्रकाश लांजेवार (४६), चुडामन रामजी भिवगडे (४४) व अशोक गरीबदास वाढई (४५) यांचा समावेश आहे. जखमींना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या अपघाताची माहिती मिळताच माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, डव्वाचे सरपंच पुष्पमाला बडोले, हितेंद्र बडोले, सभापती गिरधारी हत्तीमारे आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ. राजकुमार बडोले यांनी दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!