Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अवैध सावकारी करणारे दांम्पत्य पोलिसांच्या ताब्यात, घरझडतीत सापडली आक्षेपार्ह कागदपत्रे

Spread the love

औरंंंगाबाद : विनापरवाना अवैधरित्या खासगी सावकारी करणा-या दाम्पत्याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) ताब्यात घेतले. दाम्पत्याच्या घर झडतीतून पोलिसांच्या हाती आक्षेपार्ह कागदपत्रे लागली असून सायंकाळी उशिरापर्यंत  सापडलेल्या कागदपत्रांची छानणी उपनिबंधक सहकारी संस्था विभागाचे कर्मचारी व पोलिस करीत असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी संपुर्ण चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा शाम पाटील, शाम किसन पाटील, दोघे राहणार प्लॉट नंबर २५, होळकर चौक, सातारा परिसर हे दांम्पत्य अवैधरित्या सावकारी करीत असल्याची तक्रार उपनिबंधक सहकारी संस्था विभागाला ८ जुलै २०१९ रोजी प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अनिलकुमार दाबशेंडे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गुप्ता, उमेश देवकर, राजू टेकाळे, एस.एस. जाधव, पुजा ठावूâर, पोलिस कर्मचारी ससाणे, सुचीत्रा देव आदींच्या पथकाने राधा पाटील, शाम पाटील या दांम्पत्याच्या घरावर शुक्रवारी सकाळी ७ वाजता छापा मारला.

सहकार विभागाचे अधिकारी व सातारा पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीमध्ये पाटील दाम्पत्याच्या घरातून कोरे धनादेश, नोटरी केलेले बॉण्ड पेपर, कोरे बॉण्ड पेपर, हात उसणे पैसे बॉण्डपेपरवर नोंद घेवून दिले असल्याचे करार, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बॉण्ड पेपरवर केलेली कागदपत्रे आदी पोलिसांच्या हाती लागले. पाटील दांम्पत्याच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांची तसेच बँकेच्या पासबुकांची पोलिस छानणी करीत असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणाविरूध्दही गुन्हा दाखल झाला नव्हता.

खासगी सावकारी करणा-यांची माहिती द्या

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राधा पाटील, शाम पाटील या दांम्पत्यासोबत कोणी आर्थिक व्यवहार केले असल्यास त्यांनी सहकार विभागाच्या अधिका-यांशी अथवा सातारा पोलिसांशी संपर्क  साधुन तक्रार द्यावी असे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहकार अधिकारी उमेश देवकर (श्रेणी-१) यांनी केले आहे. तसेच शहरात कोणी खासगी सावकारी करून आर्थिक पिळवणूक करीत असल्यास त्याचीही माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे देवकर यांनी यावेळी सांगितले.

गेल्या आठवड्यात दोन महिलांवर कारवाई

उपनिबंधक सहकारी संस्था विभागाच्या अधिका-यांनी गेल्या आठवड्यात १७ जुलै रोजी गारखेडा परिसरातील विजयनगरात राहणा-या शकुंतला  लाड, सिंधुबाई रणमाळे या सावकारी करणा-या महिलांच्या घरावर छापा मारला होता. त्या कारवाईत पथकाच्या हाती अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे लागली होती. उपनिबंधक सहकारी संस्था विभागाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या सावकारी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!