Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : हाथकडीसह आठ महिन्यापूर्वी पळालेला आरोपी जेरबंद

Spread the love

औरंगाबाद  गुन्हे शाखेच्या ताब्यातून हाथकडीसह पसार झालेल्या कुख्यात आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी तब्बल आठ महिन्यानंतर गुरूवारी (दि.२५) जेरबंद केले. शेख चाँद उर्फ पाशा शेख नईम (वय २४, रा.आसेफिया कॉलनी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये गुन्हे शाखा पोलिसांनी शेख चाँद उर्फ पाशा याला सेंट्रल नाका परिसरातून संशयास्पदरित्या फिरत असतांना ताब्यात घेतले होते. पोलिसांची शिफ्ट चेंज होण्याच्या वेळी सर्व कर्मचारी गडबडीत असतांना शेख चाँद उर्फ पाशा याने हाथकडीसह पोलिस आयुक्तालयातुन धुम ठोकली होती. तसेच हाथकडी तोडून मध्यवर्ती बसस्थानकावरील एका पानटपरीचालका जवळ देत ती सोनवणे साहेबांना दे असे सांगितले होते. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नशेच्या गोळ्या बाळगणारा जेरबंद
नशेच्या गोळया बाळगणा-या अनिल अंबादास माळवे (रा.पुंडलिकनगर) याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) जेरबंद केले. अनिल माळवे याच्या ताब्यातून पोलिसांनी २२३ नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. अनिल माळवे विरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

महिलेची गळफास घेवून आत्महत्या
तिसगाव परिसरात राहणा-या अरूणा सोमनाथ डव्हाळे (वय २०) या महिलेने शुक्रवारी (दि.२६) सकाळी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. अरूणा डव्हाळे यांनी छताच्या पंख्याला साडीने बांधुन गळफास घेतला होता. अरूणा डव्हाळे यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीचोर गुन्हे शाखेकडून जेरबंद
वाळुज परिसरातील विविध भागातून दुचाकी लंपास करणा-या सुनील अप्पासाहेब किर्तीकर (वय १९, रा.एकतानगर, रांजणगांव) याला गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. सुनील किर्तीकर याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सय्यद मुजीब, मांन्टे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, पवार आदींच्या पथकाने शुक्रवारी (दि.२६) ही कारवाई केली.

हद्दपार आरोपी गजाआड 
जिन्सी परिसरातील हद्दपार गुन्हेगाराला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. शेख सलीम ऊर्फ काला शेख यासीन (रा. नेहरूनगर, कटकट गेट) असे त्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी त्याला वाढत्या गुन्हेगारीमुळे दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तरी देखील तो शहरात वावरत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन शुक्रवारी त्याला जिन्सी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके व त्यांच्या पथकाने कटकट गेट भागात पकडले. त्याच्याविरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान फोडून रोखसह दारु लंपास 
कांचनवाडीतील वाईन शॉप फोडून चोराने दारुसह २५ हजारांची रोकड लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा वाईन शॉपचे मॅनेजर प्रकाशचंद तारदत्त बवाडी (३०, रा. सैनिक विहार, कांचनवाडी) हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाईन शॉप बंद करुन गेले होते. त्यानंतर मध्यरात्री चोराने शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्याने अडीच हजारांची दारु आणि रोख लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यावर बवाडी यांनी सातारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बंडेवाड करत आहेत.

महिलेला मारहाण करुन लुटले 
महिलेला मारहाण करुन लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नारेगावातील पटेल हॉटेलसमोर घडली. शबाना मिर्झा महेमुद बेग (वय ३०, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) या मुलाला शाळेतून घेऊन घराकडे जात होत्या. त्यावेळी हॉटेलसमोर शेख गफ्फार (रा. नारेगाव) याने काहीही कारण नसताना शबाना यांना मारहाण करुन दोन मंगळसूत्र आणि कानातील रिंग असे २३ हजाराचे दागिने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.

मोबाईल हिसकावणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात , चोराचा साथीदार पसार 
पाच महिन्यांपुर्वी चौघांचे मोबाईल हिसकावून पळ काढलेल्या बुलढाणा जिल्ह््यातील एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा साथीदार पसार आहे. विठ्ठल जनार्दन काकडे (वय १९, रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अटकेतील लुटारुचे नाव आहे. त्याला क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणासाठी शहरात आलेल्या बबलु रशीद सय्यद (वय २१, रा. मिलकॉर्नर) तसेच सुमिता अरुण कुलकर्णी, गजानन रामप्रसाद अंकर व सचिन त्रिंबकराव मैड हे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी १७ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मोबाईल हिसकावले होते. तेव्हापासून दोघेही पसार झाले होते. त्यांचा तांत्रिक पध्दतीने शोध सुरू होता. बुधवारी काकडेबाबत माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे अमोल देशमुख, जमादार फारुख देशमुख, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, शेख बाबर यांनी लोणार येथे धाव घेतली. काकडेला पकडून त्यांनी एक मोबाईल जप्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!