Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सध्याचा काळ भाजपच्यादृष्टीने महत्वाचा , पक्षवाढीसाठी नवीन लोकांना प्रवेश : चंद्रकांत पाटील

Spread the love

‘सध्याचा काळ भाजपच्यादृष्टीने महत्वाचा असून सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. पक्षवाढीसाठी नवीन लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे’, असे सूतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांनी केले. भाजपच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश होते.

भाजपच्यावतीने नवीन सदस्य मोहीम सुरु असून शुक्रवारी मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवीन सदस्य नोंदणी व नव मतदार नोंदणी ताकदीने करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, ‘जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी समाज मेळावे घ्यावेत. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती जनतेला देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करावा.’

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांनी शक्ती केंद्र प्रमुखांशी चर्चा केली. तसेच शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांचे कर्तव्य, कामकाज यांची माहिती दिली. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांकडून केलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘लोकसभेतील भाजपचे यश हे कार्यकर्ता व संघटन बांधणीतून प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व समाज आणि सामान्य जनता यांना पक्षाबरोबर जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.’

राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन यांनी पदवीधर निवडणूक नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, संघटन मंत्री रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, बाबा देसाई, सरचिटणीस अशोक देसाई आदी उपस्थित होते. सरचिटणीस विजय जाधव यांनी स्वागत केले . महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आभार मानले.

भाजपने घरोघरी जाऊन पक्षनोंदणीस सुरुवात केली. सदर बाजार येथील अल्पसंख्याक समाजातील दोन घरांना प्रदेशाध्यक्ष पाटील, राष्ट्रीय मंत्री सतीश यांनी भेट दिली. दोन घरातील कुटुंबातील सदस्यांनी भाजपचे सदस्यत्वाचे फॉर्म भरले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!