Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : वामन हरी पेठे ज्वेलर्स हेराफेरी प्रकरणातील तपास , ६५ किलो दागिने , २५ बँका आणि ७० खाती , अनेकांशी व्यवहार

Spread the love

समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाशी संगनमत करून तब्बल ६५ किलो सोन्याच्या दागिन्यांची हेराफेरी करणाऱ्या राजेंद्र जैन याची शहरातील २५ बँकांमध्ये विविध प्रकारची तब्बल ७० खाती असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या खात्यांचे व्यवहार, तसेच जैनने स्वत:च्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे ठेवलेल्या मुदत ठेवी, सोने तारण कर्ज घेतले असेल तर त्याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश विशेष तपास पथकाने बँक ांना दिले आहेत. दरम्यान जैनने पोकलेनसह, चारचाकी, दुचाकीसह २६ वाहने आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. वामन हरी पेठे ज्वेलर्समधून ६५ किलो सोन्याचे दागिने पळविल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला व्यवस्थापक अंकुर राणे, ग्राहक राजेंद्र जैन आणि लोकेश जैन यांची विशेष तपास पथकांकडून कसून चौकशी सुरू आहे.

राजेंद्र जैन याच्या कारमधून पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, कर्मचारी काळे, सुनील फेपाळे, गोकुळ वाघ हे रविवारी दिवसभर करीत होते. यात आरोपी राजेंद्र जैन याने स्वत:च्या, आई, वडिलांच्या, दोन भाचे, पत्नी, वाहनचालक आणि घरकाम करणाऱ्या नोकराच्या नावे बँकेत विविध फर्मच्या नावाखाली खाती उघडल्याचे समोर आले. त्याने शहरातील २५ बँकांमध्ये ७० खाते उघडल्याचे समोर आले. त्याच्याकडील धनादेश पुस्तिकांची संख्या शंभरहून अधिक आढळली. या खात्यामधील व्यवहाराची पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे. याकरिता सर्व बँकांना पत्रे पाठवून जैन आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या खात्यातील व्यवहाराची माहिती मागविली आहे. तसेच जैन याने सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे का, या कुटुंबाचे लॉकर आहे का, त्यांच्या मुदत ठेवीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

आरोपी राजेंद्रने पोकलेनसह, चारचाकी, दुचाकी अशी एकूण २६ वाहने खरेदी केली होती. यापैकी काही वाहने त्याने विक्री केली. मोठ्या संख्येने त्याने वाहने कशासाठी खरेदी केली होती, हा प्रश्न पोलिसांना पडला. तसेच त्याने शहरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकाने खरेदी केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या तीन कारवर बँकांचे कर्ज आहे.

दी करूर वैश्य बँक, समर्थनगर (६), बँक आॅफ बडोदा, समर्थनगर (५),  अ‍ॅक्सिस बँक, निराला बाजार (१२),  सेंट्रल बँक आॅफ इंडिया, क्रांतीचौक (५), भारतीय स्टेट बँक, समर्थनगर (२), दी फेडरल बँक लिमिटेड (४),  विजया बँक  अदालत रोड (५),  नांदेड मर्चंटस् सहकारी बँक, निराला बाजार (४), देवगिरी नागरी सहकारी बँक, शाखा क्रांतीचौक (३),  बँक आॅफ इंडिया, क्रांतीचौक (१), बुलडाणा अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, आकाशवाणी शाखा (१), एचडीएफसी रेणुका कॉम्प्लेक्स निराला बाजार (१), डोंबीवली नागरी सहकारी बँक (१), कोटक महिंद्रा बँक, जालना रोड (१), पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँक हिंगोली, शाखा स्टेशन रोड (१), डॉएच बँक अदालत रोड (१), जनकल्याण को-आॅपरेटिव्ह बँक, सिडको (१), ओमप्रकाश देवडा पीपल्स को- आॅपरेटिव्ह बँक हिंगोली, शाखा बन्सीलालनगर (१), ए. यू. स्मॉल फायनान्स बँक, शाखा विद्यानगर (२), इलाहाबाद बँक, चेतन ट्रेड सेंटर, जालना रोड (१), लोकविकास नागरी सहकारी बँक सेव्हन हिल (१).

आरोपी राजेंद्र जैन याने निराला बाजार येथील एका अपार्टमेंटमधील थ्री बीएचकेचे दोन फ्लॅट खरेदी करताना बँकांकडून कर्ज घेतले. मात्र कर्जाचे हप्ते त्याने भरणे बंद केले. बँकेकडून जप्तीची कारवाई होऊ शकते, हे लक्षात घेऊन त्याने जालना जिल्ह्यातील एका गुन्हेगाराला हे फ्लॅट विक्री केल्याची इसारपावती करून दिली. त्या फ्लॅटवर त्याच्या नावाचा फलकही लावला.

आरोपी राजेंद्र जैन याने यक्ष कलेक्शन, आनंद गारमेंट्स, बी अ‍ॅण्ड बी कंपनी, किसनतारा प्रा.लि. या वेगवेगळ्या फर्म स्थापन केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या फर्मच्या नावे त्याने बँकांमध्ये खाती उघडलेली आहेत.

आरोपी राजेंद्र जैन याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्स या दुकानाच्या कोऱ्या बिलांचा गठ्ठाच हाती लागला. दागिने गहाण ठेवताना अडचण येऊ नये, याकरिता त्याने ही बिले (पावती) मिळविली होती. दागिन्याच्या वजनानुसार तो कोऱ्या बिलांवर प्रिंट करून ती बिले तो गहाण ठेवण्यासाठी आणि सोने विक्रीकरिता वापरत होता, असे सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!