Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रकन्या राही सरनोबत आणि सौरभ चौधरीने पटकावले सुवर्णपदक

Spread the love

जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारी महाराष्ट्रकन्या राही सरनोबतने आज आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत अचूक निशाणा साधला व पुन्हा एकदा सुवर्णकमाई केली. या सोनेरी कामगिरीच्या जोरावर राहीने टोकियो ऑलिंम्पिकमधील आपला प्रवेशही निश्चित केला आहे. दरम्यान, पुरुषांच्या गटात सौरभ चौधरीनेही विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

राहीने २५ मीटर पिस्तूल प्रकारात महिला गटात एकूण ३७ निशाणे साधत अव्वल स्थान पटकावले व सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासोबतच टोकियो ऑलिम्पिकसाठी आवश्यक कोटाही तिने प्राप्त केला आहे. यूक्रेनच्या ओलेना कोस्टेविकला रौप्य तर बल्गेरियाच्या एंटोनीता बोनेवाने कांस्यपदकाची कमाई केली. अर्जुन पुरस्कार विजेत्या राहीने आपलं पहिलं सुवर्णपदक २०१३ मध्ये चांगवन वर्ल्डकप स्पर्धेत पटकावलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती.
सौरभचा विश्वविक्रम
१७ वर्षीय सौरभ चौधरीने फायनलमध्ये २४६.३ इतका स्कोअर करत नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. सौरभ आधीच टोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आहे. दरम्यान, म्युनिक वर्ल्डकपमध्ये भारत तीन सुवर्णपदकांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी कायम आहे. याआधी रविवारी अपूर्वी चंदेलाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!