Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्या ऐतिहासिक निकालानंतर काँग्रेमध्ये काय चाललंय ?

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसमधील अस्वस्थता अधिकच जाणवत असून या अनपेक्षित आणि धक्कादायक निकालामुळे काँग्रेस मध्ये चलबिचल सुरु झाली आहे . या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वतः अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याने पक्षात संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पक्षात राजीनामासत्र सुरू झालं असून आतापर्यंत १३ नेत्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘मोदीलाटे’पुढे पुन्हा एकदा काँग्रेसचा निकाल लागला आहे.

जमेची बाजू एवढीच आहे कि , गेल्यावेळी ५४३ पैकी ४४ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष यावेळी ५२ जागांपर्यंतच मजल मारू शकला मात्र १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. या दारूण पराभवानंतर त्याचे तीव्र पडसाद काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीत पक्षातील आघाडीच्या पुत्रप्रेमावर राहुल यांनी थेट निशाणा साधलाच शिवाय तडकाफडकी आपला राजीनामाही सादर केला.

पक्षाला नवं नेतृत्व शोधावं लागेल आणि त्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे राहुल बैठकीत म्हणाले. त्यावर राहुल यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावं, असा आग्रह सोनिया गांधींसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी धरला मात्र राहुल यांना ते मान्य नाही. राहुल अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याचे आज पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पक्षात मोठा पेच निर्माण झाला आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या १३ नेत्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्यात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे अजयकुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष निपुन बोरा या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यात आणखीही काही नेत्यांची भर पडण्याची शक्यता असल्याने येणारा काळ काँग्रेससाठी परीक्षेचा ठरणार आहे.
निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसमधील वाढती अस्वस्थता लक्षात घेऊन भाजपने राजस्थान , मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील आपल्या  पडद्यामागील कारवाया वाढवल्या आहेत. त्यात काँग्रेसचे आमदार रमेश जरकिहोली आणि डॉ. सुधाकर यांनी रविवारी भाजप नेते एस. एम. कृष्णा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे .  तिथे भाजपचे अन्य काही नेतेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अनेक आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राजस्थानातही गृहकलह उफाळून आला आहे. या पराभवाची जबाबदारी निश्चित व्हायला हवी, अशी मागणी अनेक मंत्री दबक्या आवाजात करू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील सत्ताकारणात येत्या काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातही भाजपने काँग्रेस सरकार पाडण्याचे रणसुभे रचले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!