Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी सुरू , केंव्हाही निकाल येऊ शकतो – चंद्रकांत पाटील

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे त्यांच्या गैरकृत्यांना अभय दिले जाणार नाही. अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी सुरू आहे. योग्यवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याला भाजप धजावणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसचं माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. छगन भुजबळ जेलमध्ये गेले, अजित पवारांचे प्रकरण न्यायालयात असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला.

भाजप – शिवसेना महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या मित्र पक्षातील खळखळ संपली असून भाजप – शिवसेना रिपाईसह इतर घटक पक्षांची युती अभेद्य आहे. महायुतीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील नगर वगळता ११ पैकी १० जागा महायुती जिंकेल, असा दावासुद्धा यावेळी पाटील यांनी केला.

भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे घोटाळेबाज जेलमध्ये असतील अशी वल्गना केली होती. मात्र याच राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन शुद्धीकरण सुरू आहे का? असा प्रश्न पाटील यांना करण्यात आला. आपला देश घटनेवर चालणारा आहे. त्यामुळे भाजपचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे. कायद्यांतर्गत ज्यांच्यावर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. भुजबळ दोन वर्षे आत राहिले, अजित पवारांची केस तीन वर्षे हायकोर्टात सुरू आहे. न्यायालयाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सरकारने सादर केली आहेत. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो त्यावेळी कोणालाही वाचवण्यात येणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितलं.

संजय शिंदे यांना किंमत मोजावी लागेल

माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी भाजपशी गद्दारी केली आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. त्यांनी त्यांच्या साखर कारखान्यात सामान्य शेतकऱ्यांच्या सातबारावर कोट्यवधींची कर्जे उचलली आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणाची चौकशी सरकारने सुरू केली आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना तुरुंगात जावे लागले, त्याच धर्तीवर संजय शिंदे यांना तुरुंगवारी करावी लागेल. शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख याबाबतीत खमके असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील नाराज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. प्रवेश केलेली ही नेतेमंडळी कायमस्वरूपी भाजपात राहतील का? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. सध्या मुलगा वडिलांचे ऐकत नाही. तर बाहेरून आलेल्या नेतेमंडळींचे काय तो काळच ठरवेल, असे सांगत यावर त्यांनी जास्त बोलणे टाळले. राजकारणात माणूस चांगला असून चालत नाही. तर निवडणुकांमध्ये फक्त माणूस बरा आहे म्हणून ही उमेदवारी देता येत नाही. त्याची निवडून येण्याची क्षमतासुद्धा असावी लागते आणि ती क्षमता रणजितसिंहांमध्ये असल्याने विचारांती त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!