Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यावर २ एप्रिलपासून दुसऱ्या लॉक डाऊनची टांगती तलवार !!

Spread the love

मुंबई : देशातील १० कोरोनाबाधित शहरांमध्ये महाराष्ट्रातील ९ शहरांची  नावे केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर  अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ८ ते १० दिवसांसाठी लॉक डाऊन  घोषित करण्यात आले असले तरी या लॉक डाऊनला स्थानिक नेते आणि व्यापाऱ्यांचा विरोध होत आहे. असे असले तरी  राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून, ती रोखण्यासाठी राज्यात एका मर्यादित कालावधीसाठी २ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा दुसरा टप्पा  लागू करण्याचा सरकारचा विचार असून तशी तयारी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.


गेले काही दिवस राज्यातील अनेक मंत्री लॉकडाउन टाळायचे असल्यास लोकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, असे वारंवार आवाहन करू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशनुसार राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्याबाबतची तयारी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ही दुसऱ्या लॉकडाउनचीच पूर्वतयारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

…अन्यथा वाढू शकतो मृत्यूचा आकडा 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोनाबाबत विचार करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाउनसारखे उपाय न केल्यास राज्यातील मृत्यूचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. राज्यात कोविडबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून, ही स्थिती अशीच राहिल्यास प्रशासनाने लॉकडाउन लागू करण्याबाबत तयारी सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्यात रुग्णालयांमधील बेडची तसेच इतर सोयी सुविधांची कमतरता कमी असल्याने कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल अशी चर्चा बैठकीत करण्यात आलेली होती. मात्र, जरी यावेळी लॉकडाउन लागू करण्यात आला तरी देखील या वेळचा लॉकडाउन हा मागील लॉकडाउनपेक्षा वेगळा असेल असे समजते. या लॉकडाउनमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असेही समजते.

कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य

सरकारने नव्या प्रकारच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकांची ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते अशी ठिकाणी बंद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. लॉकडाउन लागू झाल्यास मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तसेच स्टँडअलोन शॉप्स चालविण्यासाठी विशिष्ट वेळा दिल्या जातील. तसेच मोठ्या बाजारपेठा कडक मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच सुरू राहतील असे समजते.

दुसरा लॉकडाउन लागू झाल्यास उपनगरीय रेल्वे वाहतूक, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बस सेवांना कडक नियमांचे पालन करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर चाचण्या अधिक काटेकोरपणे करण्यात येतील. उत्पादन क्षेत्र बंद करण्यात येणार नसले तरी देखील त्यांना कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!