MaharshtraWeatherUpdate : कडक उष्णतेचा इशारा , मराठवाडा , विदर्भ घराबाहेर पडताना सावधान

पुणे : आज 31 मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहे. कारण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. चेहरा झाकण्यासाठी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, त्याचबरोबर दिवसभरात भरपूर पाणी प्यावे , असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच विदर्भात उष्णतेची लाट जाणवेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 डिग्रीने वाढेल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. विदर्भामध्ये पुढची तीन दिवस हीट वेव राहणार असून या पार्श्वभूमीवर नागपूर वेध शाळेने येलो अलर्ट जाहीर केला आहे.
संपूर्ण राज्यात उन्हाचा प्रकोप जाणवू लागला आहे. उकाडा असह्य होत असल्याने अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. चंद्रपूर , सोलापूर, जळगाव या ठिकाणी तर पारा 40 अंश डिग्री पार गेला आहे.
विदर्भ-मराठवाड्यातही वाढली दाहकता
राज्यस्थान, गुजरातकडून येणारे उत्तर पश्चिमी कोरडे वारे हे महाराष्ट्रात येत असल्याने विदर्भातले तापमान वाढले आहे. सोमवारी विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरीत 43.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून बहुतांश शहराचे तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर होते. पुढील काळात या तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोस्टल एरिया अर्थात कोकण गोव्यातही उष्णेतीची लाट जाणवेल अशी माहिती पुणे वेधशाळेचे संचालक अनुपम काश्यपी यांनी दिली.
पुण्यात लवकरच पारा चाळीशी ओलांडणार
सध्या पुण्याचे तापमान 38 डिग्री आहे.मात्र 2 एप्रिलला तापमान 40 च्या वर पोहोचेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर 31 मार्च आणि 1 एप्रिलला तापमान 39 डिग्रीवर राहील असं वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान मुंबईत 1 एप्रिलनंत 5 एप्रिलपर्यंत तापमान 31 डिग्री इतकं राहील. म्हणजे तापमानाच्या तुलनेत 2 डिग्रीने तापमानात घट होणार आहे.
कोरोनाचे सावट असल्याने तोंडाला लावलेले मास्क यामुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे . त्यात कोरोनामुळे बाहेरचे पाणी, ज्यूस आणि सरबत पिण्याचीही भिती असल्याने जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेर पडणे गरजेचे असल्यास भरपूर पाणी प्या, डोके टोपी किंवा सुती कपड्याने झाका जेणेकरून उन्हापासून बचाव करता येईल.