Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAuranagabadUpdate : अखेर लॉक डाऊन स्थगित, औरंगाबाद सर्वाधिक 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद कोरोना अपडेट


43 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आजचे नावे रुग्ण : 1116 । एकूण रुग्ण : 81137

डिस्चार्ज : 1511 । एकूण : 64218

आजचे मृत्यू : 43 आजपर्यंत एकूण मृत्यू :  1651


औरंगाबाद : आजपासून जिल्हाभरात लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणी मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती लॉकडाऊन स्थगित करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे राज्यातील लॉकडाऊनवरून महाविकास आघाडीच्या तिन्हीही पक्षात मतभेद आहेत. त्याचा पहिला परिणाम म्हणून याकडे पहिले जात आहे. औरंगाबादच्या लॉक डाऊनला शहरातील व्यापारी आणि विविध पक्ष संघटनेचा विरोध होता.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनासह सर्वच दिवसरात्र एक करत प्रयत्न करत आहेत. संख्या आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, परंतु लोकप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी लॉकडाऊन संदर्भात विविध सूचना केल्या असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर आता 10 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 30 मार्च ते 8 एप्रिल अशी तारखी सुद्धा ठरली होती. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आज 30 मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सुनिल चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची आकडेवारी पाहता आज रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होणार होती, लॉकडाऊन होणार होता मात्र जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी तातडीची बैठक घेत आजपासून होणारा जो लॉकडाऊन आहे तो रद्द झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली आहे.

प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनचे नियम  लागू राहतील, अशी माहितीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

मंत्रिमंडळात लॉक डाऊन वरून मतभेद 

दरम्यान  राज्यातील  वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात्तत्याने  राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये लॉकडाऊनवरुन  मतभेद होत आहेत. तर केंद्र शासनाने हे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. तरीही  मंत्रीमंडळातील नेत्यांकडून लॉकडाऊनला विरोध केला जात आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही लॉक डाऊन लागू करायचा असेल तर रोजगाराची भरपाई द्या म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पुन्हा लॉकडाऊन नको, आम्ही विरोध करू असे  म्हटले  आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य केले  आहे. मंत्रीमंडळातही काही लोकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. जरी विरोध होत असला तरी परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा लागतो. तो असा अचानक घेतला जाणार नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय होईल. लोकांनी नियम पाळला नाही तर कठोर निर्णय घ्यायला लागेल असे ही त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला असताना, आणखी काही कडक निर्बंध लागू करायचे का याचा विचार सुरु आहे. हॉटेल, सिनेमागृहे यांसारखी गर्दीची ठिकाणे पूर्ण बंद करण्याचा विचार करावा लागेल. अर्थकारण चाललं पाहिजे आणि जीवही वाचले पाहिजेत. त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!