Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : नोकरी, कर्जाचे आमिष दाखवून वकिलासह दहा जणांना ७४ लाखांचा गंडा

Spread the love

औरंगाबाद : शेळीफार्मसाठी बँकेतून कर्ज देतो, तसेच सरकारी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने वकिलासह त्याच्या जवळच्या दहा जणांना ७४ लाख ५० हजाराला गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शैलेश बाबुराव कांबळे (४९, रा. सी-२९, सिध्दीविनायक अपार्टमेंट, गादीया विहार) असे भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उस्मानपुरा भागातील वकिल देवकांत बलवंतराव मेश्राम (४५, रा. प्लॉट क्र. १, पन्नालालनगर) यांची आॅगस्ट २०२० मध्ये मित्र अ‍ॅड. सुनील सरकटे यांची शैलेश कांबळे यांच्याशी ओळख झाली होती. सरकटे यांनी कांबळे हा बँकेत नोकरीला असून, तो मॅनेजमेंट कोट्यातून बँकेत नोकरी लावून देतो. तसेच कर्ज देखील मंजूर करुन देतो असे सांगितले होते. त्यानुसार, कांबळेची आॅगस्ट २०२० मध्ये देवकांत यांनी अभिनय थिएटरजवळील स्टेट बँक आॅफ इंडीयाबाहेर भेट घेतली. या भेटीत कांबळेने बँक आॅफ महाराष्ट्रचा कर्ज पुरवठा करणारा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविले. त्यावेळी झालेल्या बैठकीत कांबळेने ४० लाखांचे गोट फार्मसाठीचे कर्ज मंजुर करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने देवकांत यांच्याकडून ५० हजार रुपये रोखीने घेतले. तसेच देवकांत यांची कागदपत्रे देखील घेतली. देवकांत यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्वत: पंजाब नॅशनल बँक खात्याचा ५० हजारांचा चेक दिला. सुमारे पंधरा दिवसानंतर कांबळेने पुन्हा स्टेट बँक आॅफ इंडियाबाहेर बोलावून प्रोजेक्ट रिपोर्ट आल्याचे सांगत स्वाक्षरी करा असे म्हणत देवकांत यांच्याकडून आणखी दोन लाख रुपये घेतले. यापुढे ९० दिवसात कर्ज मंजूर होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यामुळे कांबळेवर आणखी विश्वास बसला. पुढे कांबळे म्हणाला की, बँकेच्या जाहिराती निघाल्या असून, नजीकच्या नातेवाईकांना नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. त्यामुळे देवकांत यांनी हा प्रकार नारायण सटवाजी भालेराव यांना सांगितला. भालेराव हे मुलगा साहील व आणखी नातेवाईकांना नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हणाले. तेव्हा कांबळेने प्रत्येक उमेदवाराकडून नोकरीसाठी सात लाख रुपये घेण्याचे सांगितले. त्यावरुन देवकांत यांनी भालेराव यांना सांगितली. मात्र, नोकरीसाठी काही पैसे अगोदर व काही नंतर देण्याचे ठरले.
……..
९० दिवसात ऑर्डर देतो म्हणत उकळले पैसे…

बँकेत नोकरी लागेल या आशेने भालेराव यांनी कुणाल नामदेव शेळके, मुलगा साहील, दीपक शिवाजी मुळे, नितेश हिरालाल बैरागी, विशाखा कारभारी हिवराळे, दत्ता बाबुराव गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख २५ हजार, अनिल कारभारी सातदिवे यांच्याकडून एक लाख योगेश प्रकाश साळवे आणि तुषार गजानन सुरडकर यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकुण १८ लाख ५० हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर ९० दिवसात नोकरीची आॅर्डर तुमच्या हातात मिळेल. त्यावेळी उर्वरीत रक्कम देण्याचे ठरले.
……
कोरोनाचे कारण पुढे करून टाळाटाळ

नोकरीचे प्रकरण सुरू असतानाच भालेराव यांनी कर्ज प्रकरणासाठी कांबळेशी संपर्क साधला. तेव्हा कांबळेने केंद्र सरकारची अ‍ॅल्युमिनीअम शिट्स बनविण्याची स्कीम आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचे कर्ज काढुन देतो. त्यात २५ टक्के सबसिडी असेल. त्यात फक्त १२ कोटी रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यावरुन भालेराव यांनी जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात चार लाख रुपये रोखीने कांबळेला दिले. त्याचवेळी त्याने नोकरीबाबत सांगत कोरोनाचे कारण पुढे करुन बँक अधिकारी हजर नसल्याचेही सांगितले. पुढे भालेराव यांनी नोकरीच्या अनुषंगाने सहा लाख रुपये दिल्यानंतर कर्ज प्रकरण व नोकरीसाठी कांबळेला पुण्यातील मित्र विश्वास शास्वी, वैभव आहेरराव यांच्याकडून देखील मोठी रक्कम मिळवून दिली. भालेराव यांना सर्वांचेच फोन येऊ लागल्याने त्यांनी कांबळेकडे पिच्छा पुरवला. तेव्हा तो वारंवार उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे संशय आल्याने भालेराव व देवकांत यांनी कांबळेशी वाद घातला. त्यावेळी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत कांबळेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक पांडुरंग भागीले करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!