Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RainNewsUpdate : जाणून घ्या पावसाचा पुढील पाच दिवाच अंदाज…

Spread the love

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहे. महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस विविध भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामानशास्त्रज्ञ डॉ.एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मराठवाड्याची स्थितीही याचप्रमाणे राहील. विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर विशेषतः कोकण, घाटमाथा आणि त्याच्या लगतच्या सखल भागांमध्ये अधिक जाणवणार आहे.

मराठवाड्यात पाऊस कमी का?

मराठवाडा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. त्यामुळे पाऊस कोकण, घाटमाथा आणि घाटमाथ्याच्या जवळच्या सखल भागात पाऊस पडतो. त्यानंतर वारे पुढे जाताना बाष्प संपलेले असते. त्यामुळे मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहते. विदर्भात देखील काहीशी अशीच स्तिती होते. मान्सूनच्या दोन शाखा असून एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडतो. परंतु, यंदा जूनमध्ये बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याचे डॉ. सानप सांगतात.

जूनमध्ये कमी पाऊस

भारताच्या दृष्टीने जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही पश्चिम भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

घाटभागात ऑरेंज अलर्ट

पुण्यात घाटमाथ्याच्या परिसरात पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुण्याचा सपाट भाग शहर व परिसर येथे अद्याप कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः घाटमाथा, कोकण आणि विदर्भात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!