अॅसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार , आरोपी गजाआड

शाळकरी विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. आणखी संतापजनक बाब म्हणजे या नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर २५ वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी हा विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. दररोज तो शाळेबाहेर थांबून विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. तसेच, तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकेल. तुझ्या घरच्या व्यक्तींना मारून टाकेल, अशी धमकी देत होता.
आरोपीने अखेर तू मला एकदा भेट म्हणत जबरदस्तीने विद्यार्थिनीला वाघोली परिसरात घेऊन गेला. त्या ठिकाणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडीओ बनविला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीचा त्रास वाढत असल्यामुळे पीडित विद्यार्थीनीने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.