Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन , सीएए आणि एनआरसीला दिला जाहीर पाठिंबा

Spread the love

मनसेच्या वतीने मुंबईत  आयोजित महामोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे  मोठे शक्ती प्रदर्शन करीत नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करताना  येत्या काळात मनसेकडून दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा गर्भीत इशारा दिला. देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन ड्राइव्ह येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व खुद्द राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.

राज ठाकरे यांनी ‘सीएए’त गैर काय असा प्रश्न विचारत देशात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांचा समाचार घेतला. तुम्हाला या देशात जे स्वातंत्र्य मिळालं आहे तितकं स्वातंत्र्य जगातील कुठल्याही देशात दिलं जात नाही. त्यामुळे सुखाने राहा. उगाच सगळं बरबाद करायचा विचार करू नका, असा खरमरीत सल्ला राज यांनी संबंधितांना दिला. जे प्रामाणिक मुसलमान आहेत त्यांनीही जगजागृती करायला हवी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं आहे. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर भाजप समर्थक म्हटलं जातंय. पण त्यापलीकडे ठोस भूमिकाही असते आणि तीच मनसेने घेतली आहे, असे राज म्हणाले. देशात आज जी आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, त्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून सीएएसारखे कायदे आणले जात असतील तर ते चुकीचे आहे. असे कायदे आणताना त्याची कठोरपणे अंमलबजावणीही करा, हेच माझे केंद्राला सांगणे असल्याचे राज यांनी निक्षून सांगितले. घुसखोरांना बाहेर काढून हा देश साफ करावाच लागेल. अशी बिळं बुजवावीच लागतील. त्याबाबत इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे राज म्हणाले. कोणतेही कायदे समजून न घेता आपली ताकद दाखविण्यासाठी देशात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं नमूद करत मोर्चाला प्रचंड प्रतिसाद देणाऱ्या कार्यकर्त्यांचे राज यांनी आभार मानले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!