Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdate | धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत जंतरमंतर सोडणार नाही’; आशुतोष रांका यांचा निर्धार

Advertisements
Advertisements
Spread the love

• Live Update:

नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून संसद मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढण्याचा पक्षाचा निर्धार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजधानीला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Advertisements

NEET-UG 2026 पेपर लीकप्रकरणी पटण्यात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ बिहारची राजधानी पटणा येथे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

Advertisements
Advertisements


‘फक्त चारच घोषणा द्या’; जंतरमंतरवर CJP कार्यकर्त्यांना आशुतोष रांका यांचे आवाहन

जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी कार्यकर्त्यांना केवळ चारच घोषणा देण्याचे आवाहन केले.

आशुतोष रांका म्हणाले, “‘भारत माता की जय’, ‘इन्किलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’ आणि ‘धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो’ या चारच घोषणा द्या. कोणत्याही नकारात्मक घोषणा देऊ नका. काहीजण वेगळे कथानक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही.”


‘जेपी नड्डा बोलावतात म्हणून आम्ही त्यांच्या कार्यालयात जाणार नाही’; सौरव दास यांची भूमिका

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, आज सकाळी दिल्ली पोलिसांनी संपर्क साधून जेपी नड्डा चर्चा करू इच्छित असल्याची माहिती दिली.

सौरव दास म्हणाले, “आम्ही कोणाच्याही कार्यालयात जाणार नाही. चर्चा करायची असेल, तर जंतरमंतरजवळील एखाद्या तटस्थ ठिकाणी भेट होऊ शकते.”

 


धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत जंतरमंतर सोडणार नाही’; आशुतोष रांका यांचा निर्धार

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

आशुतोष रांका म्हणाले, “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आमचे आंदोलन शांततापूर्ण असून मागण्या पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहील.”


जंतरमंतरवरील CJP आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील; आंदोलनकर्त्यांची घेतली भेट

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनस्थळी भेट दिली. संसद मार्च आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनस्थळी विविध सामाजिक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती कायम असल्याचे दिसून आले.


‘आमचा वेळ वाया घालवू नका’; CJP आंदोलनातील पोलिस कारवाईवरील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी

CJP संसद मार्चदरम्यान विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईविरोधातील याचिकेवर सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना फटकारले.

वकिलांनी पोलिसांच्या कथित अत्याचारांचे व्हिडिओ असल्याचे सांगितल्यानंतर CJI म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका. आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही. ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही.”


सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २५वा दिवस; पंतप्रधान मोदींना अभिजीत दिपके यांचे थेट प्रश्न

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या २५व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिपके यांनी म्हटले की, “सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २५वा दिवस आहे, तरीही पंतप्रधानांनी मौन सोडलेले नाही. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नव्हे, तर जनतेप्रती उत्तरदायी असणेही आहे.”

तसेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधून उपोषण संपवण्याचा प्रयत्न का झाला नाही? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई का केली? तसेच विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांनंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?

 


पावसाचा प्रत्येक थेंब स्वीकार, पण विद्यार्थ्यांवरील अन्याय नाही’; चंद्रशेखर आझाद यांची पोस्ट

संसद परिसरात आंदोलन केल्यानंतर आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली.

पोस्टमध्ये ते म्हणाले, “पावसाचा प्रत्येक थेंब स्वीकार आहे, पण निष्पापांवरील अन्याय स्वीकार नाही. अन्याय करणारे कितीही ताकदवान असोत किंवा त्यांच्या पाठीशी कितीही मोठी शक्ती असो, त्यांना उत्तर द्यावेच लागेल. महापुरुषांचे विचार हीच माझ्या संघर्षाची ताकद आहेत. जय भीम, जय भारत.”


जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे; CJP आंदोलनाला दिली भेट

CJPचे मोठे अपडेट; ताब्यातील सर्व आंदोलनकर्त्यांची सुटका, दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेरील धरणे मागे

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी मोठी माहिती दिली आहे. पक्षाच्या वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे.

यामुळे दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले असून, सर्व समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दिल्ली हायकोर्टाच्या परवानगीनंतर सोनम वांगचुक मेदांता रुग्णालयात दाखल

दिल्ली उच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात पोहोचली आहे. त्यांच्या प्रकृतीवर आता मेदांता येथील वैद्यकीय पथकाकडून पुढील उपचार आणि देखरेख केली जाणार आहे.

 


जंतरमंतर आंदोलनस्थळी वाढली गर्दी; प्रवेशद्वाराबाहेर शेकडो आंदोलनकर्ते जमले

जंतरमंतर येथील आंदोलनस्थळाच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वाराबाहेर शेकडो आंदोलनकर्ते आणि समर्थक जमा झाले आहेत. आंदोलनस्थळी गर्दी सातत्याने वाढत असून, परिसरात दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रवेश आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.


जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी सुप्रिया सुळे यांची भेट; CJP आंदोलनाला पाठिंबा


जंतरमंतरला शरद पवारांची भेट; जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस, पोलिस कारवाईबद्दल चिंता व्यक्तसंसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

 


आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरात आंदोलन केले. नीट पेपर लीक प्रकरण आणि काल कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या संसद मार्चदरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

चंद्रशेखर आझाद यांनी संसदेत या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, असेही म्हटले.


‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’; CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचा इशारा

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केले की, सरकारने अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नसल्यामुळे जंतरमंतरवरील धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.

आशुतोष रांका म्हणाले, “आमच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे धरणे आंदोलन सुरूच राहील. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांततापूर्ण आंदोलन मागे घेणार नाही.”


CJP संसद मार्चदरम्यान लाठीचार्ज; अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या संसद मार्चदरम्यान पार्लमेंट स्ट्रीट रोड परिसरात झालेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.


जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांनी सोडले उपोषण; CJP संस्थापक अध्यक्षांचा निर्णय

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी जंतरमंतर येथे सुरू असलेले आपले उपोषण समाप्त केले. संसद मार्च आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषण सोडल्याची घोषणा केली. आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीदरम्यान हा क्षण पार पडला.

 


संसद परिसरात अभूतपूर्व सुरक्षा; पावसाळी अधिवेशन आणि CJPच्या संसद मार्चमुळे कडेकोट बंदोबस्त

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असताना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रस्तावित संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. संसद भवन आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून, प्रत्येक वाहन आणि व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे.


जंतरमंतरवर फारूक अब्दुल्ला; ‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या, सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून मुक्त करा’

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKNC)चे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

फारूक अब्दुल्ला म्हणाले, “हे विद्यार्थी भारताचे भविष्य आहेत. ते त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. त्याचबरोबर लडाखमधील प्रश्नही सोडवावेत. तसेच, सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून मुक्त करण्यात यावे.”


CJP आंदोलनावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया; ‘शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज का?’

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

थरूर म्हणाले, “शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज करण्याचे कारण काय? लाठीचार्ज हा अहिंसेचा नव्हे, तर हिंसेचा प्रकार आहे.”

संसदेतील गोंधळाबाबत ते म्हणाले, “देशभरातील ज्वलंत प्रश्नांवर संसदेत चर्चा व्हायला हवी. संसद हे जनतेच्या भावना आणि चिंता मांडण्याचे व्यासपीठ आहे. विरोधकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. सरकारकडे बहुमत आहे, त्यामुळे शेवटी निर्णय त्यांचाच असेल; पण चर्चा नाकारल्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.”

 


CJPचा संसद मार्च राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला; दिल्लीत सुरक्षा अधिक कडक

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चा संसद मार्च पुढे सरकत राष्ट्रपती भवन परिसरापर्यंत पोहोचला आहे. आंदोलनकर्ते संसदेकडे कूच करत असून, परिसरात दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. राष्ट्रपती भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.


गोंधळ आणि दबावाचे राजकारण योग्य नाही; संसद अधिवेशनावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या गदारोळावर भाजप खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, संसद ही सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे. गोंधळ घालणे, कामकाजात अडथळे निर्माण करणे आणि अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नाही.

कंगना रणौत म्हणाल्या, “जनतेने सरकार निवडून दिले आहे आणि सरकार कसे चालवायचे, हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. एखाद्याला पदावरून हटवायचे किंवा ठेवायचे यासाठी सरकारवर दबाव टाकणे योग्य नाही. जर एखाद्याला इतके ठाम मत असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी.”

त्यांनी पुढे दावा केला की, “हळूहळू प्रत्येकजण भारतीय जनता पक्ष आणि सनातन संस्कृतीकडेच येईल, कारण ती आपली स्वतःची संस्कृती आहे.”


जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेला डम्पर, फुटलेल्या काचांची कार; CJP कडून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दावा केला की, जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्यासाठी हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र, या आरोपांवर दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


‘माझी प्रकृती चांगली आहे, मला संसद मार्चमध्ये सहभागी होऊ द्या’; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र

उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या संचालकांना पत्र लिहून, आपली प्रकृती चांगली असून आरोग्याचे सर्व निकष सामान्य असल्याचा दावा केला आहे. त्यांनी संसद मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी तात्पुरती रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.

पत्रात वांगचुक यांनी म्हटले आहे की, “आज माझी प्रकृती उत्तम आहे आणि माझे आरोग्याचे सर्व निकष सामान्य आहेत. त्यामुळे कृपया मला काही काळासाठी रुग्णालयातून बाहेर जाऊ द्या, जेणेकरून मी आज सकाळी सुरू होणाऱ्या संसद मार्चमध्ये सहभागी होऊ शकेन.”


CJP आंदोलनात शबाना आझमींची उपस्थिती; ‘आम्ही शांततापूर्ण आंदोलनासाठी आलो आहोत’

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या प्रस्तावित संसद मार्चपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी जंतरमंतर येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार संविधानाने दिला असल्याचे सांगितले.

शबाना आझमी म्हणाल्या, “आम्ही सर्वजण संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी येथे आलो आहोत. महात्मा गांधींनी आम्हाला अहिंसक आंदोलनाचा मार्ग दाखवला. आम्ही त्याच तत्त्वांवर उभे आहोत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.”


आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनस्थळी भेट दिली. आज CJP ने संसद मार्चचे आयोजन केले असून, त्याआधी आंदोलनस्थळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहत आहेत. यावेळी अभिनेते प्रकाश राज हे देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.


CJP संसद मार्चचा परिणाम; नोएडा-दिल्ली मार्गावर वाहतूक कोंडी

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा तपासणी अधिक कडक केली आहे. यामुळे नोएडा-दिल्ली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीमावर्ती भागात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 


कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन डीसीपी कार्यालयात नेले

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी उप-पोलिस आयुक्त (DCP) कार्यालयात नेण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.


जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; संसद मार्च रोखताना पोलिसांची कारवाई

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) संसद मार्चदरम्यान जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक विद्यार्थ्यांना संसदेकडे जाण्यापासून रोखताना दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  • संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त.
  • आंदोलक विद्यार्थ्यांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला.
  • पोलिसांनी त्यांना अडवत लाठीचार्ज केल्याची माहिती.
  • राजधानीतील अनेक मेट्रो स्थानकांवर निर्बंध, काही ठिकाणी इंटरनेट सेवाही प्रभावित.
  • परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष.

सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


अनेक भाग ‘नो-गो झोन’ घोषित

सुरक्षेच्या कारणास्तव राजधानीतील अनेक महत्त्वाच्या परिसरांमध्ये आंदोलकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. विजय चौक, संसद मार्ग, ट्रान्सपोर्ट भवन, इंडिया गेट परिसर, राष्ट्रपती भवन, सेवा तीर्थ, पंतप्रधान निवासस्थान, गृहमंत्री निवासस्थान तसेच भाजप मुख्यालय परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, हे भाग ‘नो-गो झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.


५,००० हून अधिक जवान, २५ बटालियन तैनात

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त सुरक्षा आराखडा तयार केला आहे. ५,००० हून अधिक पोलीस व सुरक्षा जवान तसेच सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या २५ हून अधिक बटालियन राजधानीतील संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

संपूर्ण नवी दिल्लीची १५ सुरक्षा झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून, स्पेशल सीपी, जॉइंट सीपी आणि डीसीपी दर्जाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार, जाळपोळ किंवा सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. वज्र दंगलविरोधी वाहने, वॉटर कॅनन आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम्सही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


मेट्रो, रुग्णालये आणि सीमांवर हाय अलर्ट

परिस्थिती गंभीर झाल्यास नवी दिल्लीतील काही मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. सर्व मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जवळील रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, दिल्लीत प्रवेश करणाऱ्या सर्व सीमांवर आणि राजधानीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.


मोर्चाला परवानगी नसल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा

दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, २० जुलै रोजी प्रस्तावित संसद मार्चासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. मोर्चासाठी अर्जही प्राप्त झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या नवी दिल्ली परिसरात कलम १६३ लागू असून, जंतर-मंतर येथेच मर्यादित स्वरूपात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, सरकारकडून चर्चेचा प्रयत्न सुरू झाला असला तरी अद्याप कोणतीही ठोस स्पष्टता समोर आलेली नाही.

ते म्हणाले, “प्रशासन सरकारसोबत चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी खूप उशिरा पुढाकार घेतला असला, तरी आम्ही मनापासून चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या बाजूने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे.”

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना दास म्हणाले, “सोनमजींची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. देशातील जागृत झालेल्या तरुण आंदोलनकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या मते, जनतेचे म्हणणे ऐकण्यास असमर्थ ठरलेल्या व्यवस्थेविरोधात शांततापूर्ण आंदोलन सुरू राहील.”

यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “गेल्या ३० दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन सुरू असून, लवकरच आणखी एक शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन कसे करायचे आणि आपली भूमिका प्रभावीपणे कशी मांडायची, याचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!